यवतमाळ च्या प्रशासकीय राजकारणात नेत्याने बळी? तुघलकाने आदेश? प्रशासन राजकारण करण्यात गुंग? आँक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू?
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि ६ मे २०२१
असं म्हणतात ” शक्तिपटलाच्या(बुद्धिबळाच्या) राजकारणात एक प्यादा सुद्धा राजाचा बळी घेण्याचा अधिकारी असतो “. असंच काहीस चित्र यवतमाळ जिल्ह्याच्या प्रशासकीय राजकारणात एका दळभद्री नेत्याने घडवून आणलं व राजाचा बळी घेत आज संपूर्ण जिल्ह्याला सुनिश्चित पने कोरोनाच्या अनिश्चित युद्धात लोटलं…!
मागील वर्षी 2020 च्या सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हा सुरूवातीच्या तीन महिन्यांत एकही मृत्यू झाला नाही. मात्र सुरुवातीच्या सद्यस्थितीनंतर कोरोनाबाधितांचा मृत्यूदर वाढला आहे. तेव्हाही जिल्हाधिकारी सक्षम होतेच , हेच प्रशासन व हेच डॉक्टर होते. पण आता असे काय घडले की मृत्यूदर वाढ सुरु झाली ती आजतायत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसगणिक वाढतच आहे. काही काळापूर्वी कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला जिल्हाधिकाऱ्यांनी भेटीसाठी ताटकळत ठेवले होते, अशी माहिती आहे. याचे कारण म्हणजे तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात तत्कालीन पालकमंत्री बसलेले होते. खुप वेळ ताटकळत ठेवल्यामुळे या ज्येष्ठ नेत्याला आपला अपमान जाणूनबूजून केला, असे वाटले आणि आता जिल्हयातील सर्व डॉक्टर्स जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात एकवटले असल्यामुळे आपल्या ‘त्या’ अपमानाचा बदला घेण्याची योग्य वेळ असल्याची जाणीव या कॉंग्रेस नेत्याला झाली असावी. अन् त्यांनी मग या भडकत्या प्रकरणाला हवा देण्याचे काम सुरू केले. या सर्व भानगडीत कोरोना हा विषय पूर्णतः मागे पडला आणि कोरोनामुळेच डॉक्टर्स आणि जिल्हाधिकारी हा वाद सुरू झाला असे सांगण्यात येते. जिल्हाधिकारी स्वतः पीपीई कीट घालून कोरोना वार्डात जायचे.काही ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन लावायलाही माणूस नाही. ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला. अशावेळी जिल्हाधिकारी कुणाला बोलले असतील, तर त्यात चुक काय? काही डॉक्टरांनी कामही करायचे नाही आणि त्यांना कुणा काही बोलायचेही नाही, असे असेल तर जमणार नाही, ही जिल्हाधिकारी सिंग यांची भूमिका होती, असे काही लोकांचे म्हणणे आहे.
या राजकारणात जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांना बाजूला करून त्यांच्या जागेवर अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात कोरोनामुळे भयानक परिस्थितीत असताना तात्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ताठस्थपणे वेळप्रसंगी सहकारी अधिकाऱ्यांची नाराजगी सुद्धा ओढवून घेत कोरोना संकटात नागरिकांसाठी योग्य उपाययोजना केल्या. अधिककऱ्यांना वेळेआधीच सूचना् देत कार्यक्षम होण्याच्या् उद्देशाने दिनांक 8 मार्च साईओ,पोलीस अधिक्षक, डिएचओ सह अन्य अधिकाऱ्यांच्या् कर्तव्य कसुराबद्दल विभागीय आयुक्तांना खाजगी पत्र देऊन कोरोना संकटात संबधित प्रशासनातील अधिकारी सहकार्य करित नसल्याचे लक्षात आणुन दिले होते हे विशेष. मात्र राजकीय मानपमानात चे सिंग बळी ठरले. यवतमाळ जिल्ह्यातील आज जिल्ह्यातील एकंदरीत स्तिथी बघता तात्कालीन जिल्हाधिकारी सिंह यांनी 8 मार्च ला विभागीय आयुक्तांकडे पत्रनोंदीत केलेले भाकित सध्याच्या स्थितीत तंतोतंत खरे ठरत चालले आहे.जसजसा मृतकांचा आकडा वाढत आहे तसतशी आता काहीशी अक्कल फुटलेल्या जिल्ह्यातील मोजक्या अधिकाऱ्यांना सिंह यांचे भाकित खरे ठरले असल्याचा साक्षात्काकर झाला असल्याचे त्यांच्या खाजगी चर्चेतून कळते.
जिल्हा प्रशासनात सीईओ ,एसपी,सीएस,डिएचओ आदी अधिकारी कोरोना संकटाला गांभीऱ्यांने घेत नसल्याने जिल्ह्यात कोरोना संकट नव्याने डोकं वर काढणार असे भाकित करणारे पत्र दि.8 मार्च मार्च रोजी तात्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी विभागीय आयुक्त यांना दिले होते.त्यामागचा त्यांचा कार्यक्षम हेतू काय असावा हे मागील 13 महिने ते 22 एप्रिल 2021 ची तुलनात्मक स्थिती पुढीलप्रमाने…
1) रुग्णसंख्या : दिनांक 25 मार्च 2021 पर्यंत जिल्ह्यात 25836 रुग्ण आढळून आले होते मात्र पुढे अवघ्या 25 दिवसात ही संख्या 15621ने वाढून 41457 झाली.याचाच अर्थ मागील 13 महिन्यांच्या तुलनेत मागच्या महिन्याभरात रुग्ण संख्या 60 टक्क्यांनी वाढली.
2)मृत्यूसंख्या : 26 मार्च पर्यंत 591 असलेली मृतकांची आकडेवारी गेल्या 25 दिवसांत दररोज 15 च्या सरासरीने वाढून 962 झाली. म्हणजे फक्त मागील 25 दिवसांत 371 रुग्ण दगावले.
3)तपसण्या : शासनाच्या आरोग्य विभागाच्या जिल्हानिहाय अपेक्षित आकडेवारी नुसार दररोज 8500 तपासण्या होणे गरजेचे असतानाही जिल्ह्यात निव्वळ 5000 अधिक नमुने जमा होत असल्याचे निदर्शनास आले असून एक तर अनेक बाधित रुग्णांची योग्य वेळी तपसणी होत नाहीये किंवा उशिरा होत असल्याने संसर्ग वाढत असावा.
4)रुग्णांची वाढती टक्केवारी : मार्च महिन्यात रुग्ण बाधित होण्याचा रेशो 7 % असताना आता मात्र एप्रिल मध्ये 22% नी रुग्ण वाढ होत आहे.दररोज तपासल्या जाणाऱ्या 5000 नमुन्यातून 1000पेक्षा अधिक बाधित उघडकीस येत आहेत.
5) अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा : जिल्ह्यात किती ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येऊन कार्यान्वित झाले आहेत, पुरवठा किती होतो आहे शिवाय नाशिक सारखी गॅस गळतीची घटना घडू नये म्हणून काय उपयोजना जिल्हा प्रशासनाने नियोजित केल्यात अनुत्तारित आहे. 6) खाटांची अपुरी व्यवस्था : जिल्यातील सर्व सरकारी रुग्णालयात उपलब्ध खाटांची स्थिती रुग्णांच्या तुलनात्मक आकडेवारीपेक्षा तुटीपुंजी आहे. उपचाराअभावी मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
7) मृतसंस्कार : मृतक व इतर तत्सम मृतकांचे दाहसंस्कार एकाच ठिकाणी होत आहेत त्याकरिता जिल्हाप्रशासनातर्फे संबंधित नगर पालीकांना काय निर्देश देण्यात आलेत.
8) प्रशासकीय यंत्रनेतील असुविधा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा गेल्या 13महिन्यांच्या तुलनेत मागील 25 दिवसात मृतकांची संख्या 16 वरून 35 म्हणजे दुप्पट झाली आहे. जिल्हापरिषद मुख्याधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांचे याकडे फारसे लक्ष दिसत नाही.
9) आवश्यक नेमणूका : मार्च ते एप्रिल 2021 दरम्यान जिल्ह्यात नेमके किती कंन्टेनमेंट झोन तयार करण्यात आले. गृह विलगीकरण रुग्णांच्या देखरेखीसाठी किती ठिकाणी प्रशासकीय नेमणूका केल्या गेल्या.
10) तुघालकी आदेश व सामान्यजन : शिवाय जिल्हा प्रशासनाद्वारे जे आदेश आता जारी केले जात आहेत त्यामुळे लहान व्यापारी समुदायासाठी गोंधळ आणि प्रचंड समस्या निर्माण करणारे असल्याने या लोकांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी प्रशासन घेणार काय…?सध्यस्थितीत सोशल डिस्टनसिंग न पाळणे, लग्न समारंभ मध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे, आधी नियम पायदळी तुडविल्याने हा आलेख वाढल्याचे नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची कठोर अंमलबजाववनी करणार असल्याचे सांगितले असले तरीही वरील मुद्दे ध्यानात घेतल्यास लक्षात येईल की रुग्ण संख्या वाढण्याचे नेमके कारण हे नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनिक ढिलाई, दिरंगाई व अनुभवहीनता व जिल्ह्यातील सिंग यांच्या तक्रारीप्रमाणे निश्चितच कर्तव्य कसूर करणाऱ्या काही बड्या अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यावर ही परिस्थिती ओढावली असल्याचे कोरोनाची वाढती आकडेवारी स्पष्ट करते आहे. साप निघून गेल्यावर काठी ठोकल्याप्रमाणे ” ज्या काळात वेळीच योग्य उपाययोजना व त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक होते तेव्हा प्रशासन राजकारण करण्यात गुंग असल्याने आता जिल्ह्यात ही कोरोनाची बिकट परिस्तिथी ओढवली असल्याचे व तत्कालीन जिल्हाधिकारी सिंग यांनी सुचविल्याप्रमाणे योग्य कारवाई झाली असती तर जिल्ह्याचे चित्र वेगळे असते असा सूर आता सामान्य नागरिकांतही उमटायला लागला आहे. जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी तक्रार केली होती त्याबद्दल राजकीय- सामाजिक-वैद्यकीय वर्तुळात याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.