पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक (भाग-३)
Summary
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्यात आल्या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. […]
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्यात आल्या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. या लेखाचा भाग तिसरा प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यामुळे मतदार आणि वाचकांनाही या माहितीचा उपयोग होईल, अशी आशा आहे.
अंध किंवा दिव्यांग मतदाराकडून मतदान (नियम –40)
विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी अंध व दिव्यांग मतदाराना त्यांच्यावतीने व त्यांच्या इच्छेप्रमाणे मतपत्रिकेवर मत नोंदविण्यासाठी १८ वर्षापेक्षा कमी नाही इतक्या वयाची एखादी व्यक्ती मदतनीस म्हणून घेता येऊ शकते. परंतु, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मतदान केंद्रावर एकाच दिवशी एकाहून अधिक मतदाराचा मदतनीस म्हणून काम करण्यास परवानगी देता येणार नाही आणि त्या मतदाराच्या वतीने त्यांनी केलेली मत नोंदणी तो (मदतनीस) गुप्त ठेवेल. मतदानाच्या गुप्ततेबाबत आणि मतदाराचा सोबती म्हणून यापूर्वी काम केलेले नाही अशा अर्थाचे प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात केंद्राध्यक्षांनी त्या व्यक्तीकडून करून घेतले पाहिजे. अशा सर्व प्रकरणांची नोंद नमुना १४ (अ)मध्ये मतदान केंद्राध्यक्षांनी ठेवावयाची आहे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी यांनी अंध व दिव्यांग मतदाराबरोबर मतदान कक्षात जाऊ नये.
प्रदत्त मतपत्रिका (TENDERED VOTE) (नियम ४२)
अमूक एक विशिष्ट मतदार म्हणून एखादी व्यक्ती अगोदरच मतदान करुन गेल्यावर जर आणखी एखादी व्यक्ती आपणच अमूक ती विशिष्ट व्यक्ती आहोत असे सांगून मतदान करण्यास आली तर त्याची ओळख पटविण्यासंबंधी केंद्राध्यक्षाची खात्री होईपर्यंत केंद्राध्यक्षांना आवश्यक वाटतील असे प्रश्न त्यास विचारुन त्या मतदाराच्या ओळखीबाबत खात्री पटवावी. ओळखीबाबत मतदाराची खात्री पटल्यास त्या मतदारास डाव्या हाताच्या तर्जनी/ मधल्या बोटावर पक्क्या शाईने खूण करुन त्या मतदाराच्या बाबतीत प्रदत्त मतदाराच्या यादीमध्ये (नमुना १५) आवश्यक ती नोंद केंद्राध्यक्षानी घ्यावी आणि त्यामध्ये मतदाराची सही घ्यावी. त्यानंतर त्या मतदारास एक मतपत्रिका द्यावी. ही मतपत्रिका मतदान केंद्रावर मतपत्रिकेच्या गट्ठयातील मतपत्रिकेच्या शेवटच्या गट्ठयातील शेवटच्या अनुक्रमांकाची मतपत्रिका असेल. अशा मतपत्रिकेच्या मागील बाजूस आणि तिच्या स्थळप्रतीवर मतदान केंद्राध्यक्षानी स्वतःच्या हस्ताक्षरात “प्रदत्त मतपत्रिका” असा मजकूर लिहून त्याखाली आपली सही करावी. त्यानंतर ती मतपत्रिका त्या मतदारास देऊन त्यास मतदान कक्षास जाऊन मत नोंदविण्यास केंद्राध्यक्ष सांगतील. मतदाराने संबंधित प्रदत्त मतपत्रिकेवर मत नोंदविल्यानंतर मतदार ती मतपत्रिका मतपेटीत न टाकता केंद्राध्यक्षाकडे देईल. केंद्राध्यक्षांनी अशा प्रकारच्या सर्व प्रदत्त मतपत्रिका आणि नमुने १५ मधील यादी त्यासाठीच्या संविधानिक लिफाफ्यात ठेवाव्यात. प्रदत्त मतपत्रिकेचा हिशोब हा नमुना १६ च्या भाग १ मधील हिशोबाच्या बाब ४ (क) मध्ये मतदान केंद्राध्यक्षास दर्शवावयाचा आहे, हे केंद्राध्यक्षांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
प्रदत्त मतपत्रिका (TENDERED VOTE) देण्याबाबत कार्यवाही (नियम ४२)
कायदेशीर तरतूद – निवडणुकांचे संचालन नियम १९६१ नियम ४२ नुसार अनुसरावयाची कार्यपद्धती – मतदाराची ओळख पटविणे, नमुना १५ मध्ये मतदाराची सही घेणे, पुरवण्यात आलेल्या मतपत्रिकेमधील शेवटच्या अनुक्रमांकाची मतपत्रिका देणे, मतदान केंद्राध्यक्षाने मतपत्रिकेच्या स्थळप्रतीवर “प्रदत्त मतपत्रिका” लिहिणे व स्वाक्षरी करणे, पुरवण्यात आलेल्या विशेष लिफाफ्यात ठेवणे.
आक्षेपित मते (CHALLANGED VOTE) (नियम ३६)
आपण अमूक एक मतदार आहोत असा दावा सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या ओळखीबाबत, कोणताही मतदान प्रतिनिधी आक्षेप घेऊ शकेल व प्रथमतः अशा प्रत्येक आक्षेपादाखल रोख दोन रुपयाची रक्कम मतदान केंद्राध्यक्षाकडे आक्षेप शुल्क म्हणून ठेवील. रक्कम भरल्यानंतर आक्षेपकाला त्याची पावती देण्यात येईल. अशा प्रकारे रक्कम आक्षेप शुल्क ठेवल्यावर मतदान केंद्राध्यक्ष
आक्षेपित व्यक्तीला तोतयेगिरीबद्दल होणाऱ्या शिक्षेबाबत इशारा देईल.
मतदारांच्या यादीतील संबंधित नोंद संपूर्णपणे वाचून दाखवील आणि त्या नोंदीत निर्देशलेली व्यक्ती तीच आहे काय म्हणून विचारील.
नमुना क्रमांक १४ मधील आक्षेपित मताच्या यादीत तिचे नांव व पत्ता नोंदवील
सदरहू यादीत आपली सही करण्यास त्यास भाग पाडील.
त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष हा दिलेल्या आक्षेपाबाबत संक्षिप्त चौकशी करील आणि त्यासाठी –
(अ) आक्षेपकास आक्षेप सिध्द करण्यासाठी पुरावा देण्यास व आक्षेपित व्यक्तीस आपली ओळख शाबित करण्यासाठी पुरावा दाखल करण्यास भाग पाडील.
(आ) आक्षेपित व्यक्तीस, तिची ओळख पटवून घेण्यासाठी आवश्यक असे कोणतेही प्रश्न विचारील आणि तिला शपथेवर उत्तर देण्यास भाग पाडील.
(इ) आक्षेपित व्यक्तीस, आणि साक्ष देण्यास पुढे येणाऱ्या कोणत्याही अन्य व्यक्तीस शपथ घेण्यास लावील.
चौकशीनंतर आक्षेप शाबित झाला नाही असे मतदान केंद्राध्यक्षाला वाटल्यास तो आक्षेपित व्यक्तीस मत देण्यास मुभा देईल आणि जर आक्षेप शाबित झाला तर तो आक्षेपित व्यक्तीस मत देण्यास प्रतिबंध करण्यात येईल.
घेतलेला आक्षेप गैरलागू आहे अथवा प्रामाणिकपणे घेतलेला नाही असे मतदान केंद्राध्यक्षाचे मत असेल तर तो पोट-नियम (१) अनुसार ठेवलेली अनामत रक्कम सरकार जमा करण्याचा आदेश देईल आणि आक्षेप फेटाळाला गेल्यामुळे संबंधित मतदारास मतदानास अनुमती देईल. त्याचप्रमाणे आक्षेप खरा निघाल्यास संबंधित आक्षेप शुल्क आक्षेपकास परत करील त्याचप्रमाणे शुल्क परत करतांना आक्षेप घेणाऱ्या मतदान प्रतिनिधींची आक्षेप शुल्काच्या पावती पुस्तकातील स्थळप्रतीवर स्वाक्षरी घेईल आणि त्या व्यक्तीस मतदान केंद्राबाहेर काढून देईल किंवा पोलीस ठाणे अधिकारी यांचे नावे तक्रार नोंदवून पोलिसाच्या ताब्यात देईल.
मतदाराने मतपेटीमध्ये बनावट मतपत्रिका {Spurious Ballot Paper} टाकणे
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१च्या कलम १३६ अन्वये दखलपात्र गुन्हा असल्याने नियमानुसार कारवाई करणे. बनावट मतपत्रिकेस प्रतिबंध करणे- मतदान केंद्राध्यक्षाने मतपत्रिकेच्या मागील बाजूस स्वाक्षरी करणे. मतपत्रिकेच्या मागील बाजूस विभेदक चिन्ह मारणे. प्रत्येक मतदाराने मतपत्रिकेवरील विभेदक चिन्ह दाखवूनच मतपेटीत मतपत्रिका टाकणे. ज्या मतदान अधिकाऱ्याच्या ताब्यात मतपेटी असेल त्याने मतदार मतपेटीत अस्सल मतपत्रिका (Genuine Ballot Paper) टाकत आहे, याची खात्री करावी.
मतदानानंतर मतपेट्या मोहोरबंद करणे (नियम-44) – मतदान संपल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे प्रतिज्ञापन भरून त्यावर स्वाक्षरी करून मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षरी घ्याव्यात. शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर खिडकीचे झाकण मोकळे करण्यासाठी ती धातूची तार सोडून टाका आणि दोरी कापून टाका. खिडकीचे आच्छादन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा आणि बटन त्याच दिशेने थांबेपर्यंत जोराने असे फिरवा की फट पूर्णपणे बंद होईल. खिडकीचे झाकण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा म्हणजे खिडकी पूर्णपणे बंद होईल. खिडकीचे झाकण आणि बटन एकत्र करा. खिडकीच्या झाकणातील छिद्र आणि बटनातील संलग्न छिद्र यामधून तारेचा एक तुकडा घाला आणि तारेची दोन्ही टोके एकत्र करून काही वेळा घट्ट पिळ द्या. त्या छिद्रांमधून धागा ओवून घ्या. त्या धाग्याला गाठी मारून घ्या व मतपेटी तयार करताना लावलेले पिवळे लेबल लावून लाखेने सील करावा.
मतपेटी बंद करून सुरक्षित केल्यानंतर मतपेटीच्या चारी बाजूच्या लांबी व रुंदी कडून एकमेकांना छेद जाईल अशा रितीने कापडी रिबीन (फित) हँडलच्या खालून झाकणावर गुंडाळा व त्यानंतर घट्ट गाठ मारा. त्यानंतर जाड कागदाचा अथवा पुठ्याचा तुकडा ठेवून त्या गाठीला तुमची मोहोर उमटावा व मतदान प्रतिनिधीची इच्छा असेल तर त्यावर त्यांच्या मोहरा उमटवण्यास सांगा. ही मोहोरबंद मतपेटी कापडी पिशवीत ठेवा आणि पिशवीला व्यवस्थित शिवून टाका व त्या शिवनाच्या टाक्यावर लाखेने सील करा. आता या मतपेटीवर मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव; मतदान केंद्राचा अनुक्रमांक व नाव; मतपेटीचा कोरीव क्रमांक व मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या मतपेटीचा अनुक्रमांक व मतदानाची तारीख असलेली पत्ता खूणचिठ्ठी चिटकावा. (या पत्ता खूणचिठ्ठीवर मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या मतपेटीचा अनुक्रमांक हा अपूर्णांक स्वरूपात लिहावा जसे की 2 मतपेट्या वापरल्या असतील तर पहिल्या मतपेटीवर 1/2 व दुसऱ्या मतपेटीवर 2/2 असा अनुक्रमांक नमूद करावा.)
नोंदविलेल्या मतपत्रिकेचा हिशोब 16
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नोंदविलेल्या मतांच्या हिशेबाचा नमुना 16चे भाग 1 मध्ये तयार करणे आवश्यक आहे. मतदान संपल्यानंतर मतपेटीमध्ये नोंदविलेल्या मतांची संख्या, मतदान अधिकारी क्रमांक 1 यांचेकडील मतदानाची आकडेवारी, मतदान अधिकारी क्रमांक 2 यांचेकडील शिल्लक मतपत्रिका, सदर नमुन्याच्या प्रमाणित प्रति उपस्थित प्रतिनिधींना देऊन त्याबाबतची पोच घोषणापत्रावर घेण्यात यावी. सदर नमुन्याचा एक लिफाफा सोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यासाठी सुपूर्द करावा.
मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी
मतदानाच्या संपूर्ण कामकाजाचे व महत्त्वाच्या घडामोडीचे वर्णन मतदान केंद्राध्यक्षांनी वेळोवेळी दैनंदिनीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. जोडपत्र 15 मध्ये आपणांस मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी पुरविण्यात येईल. मतदान केंद्रावरील एखाद्या घटनेचा पुरावा म्हणून वा आयोगाकडे परस्पर प्राप्त होणाऱ्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीचा उपयोग केला जाऊ शकतो. मतदान केंद्रावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडीबाबत वरिष्ठांना तातडीने माहिती देणे आवश्यक राहील. अन्यथा इतर मार्गाने आयोगाला माहिती समजल्यास त्याबाबत आपल्या विरूध्द कार्यवाही होऊ शकते, याची नोंद घ्यावी. आवश्यक घटनांची योग्यवेळी दैनंदिनीमध्ये नोंद न घेणे केंद्राध्यक्षाला अडचणीचे ठरू शकते. त्यानुसार केंद्राध्यक्षांनी वेळोवेळी अचूक नोंदी दैनंदिनीमध्ये घेतल्या जातील, याची खबरदारी घ्यावी.
मतदान झाल्यानंतर करावयाची कामे
मोहोरबंद मतपेट्या व पाकिटे ठेवण्यासाठी संकलन केंद्राकडे जाण्याचा कार्यक्रम समजावून घ्या. संकलन केंद्रात मतपेट्या इतर पाकीटे शाबूत स्थितीत नेऊन देणे व त्याबद्दल पोच घेणे ही तुमची वैयक्तिक जबाबदारी राहील. पुढे नमूद केलेल्या अकरा विविध वस्तू तुम्हाला संकलन केंद्राच्या स्वाधीन करावयाच्या आहेत. 1)मोहोरबंद मतपेटी/मतपेट्या 2)न वापरलेली/ वापरलेली मतपेटी / मतपेट्या 3)न वापरलेली/ल्या कॅनव्हास पिशवी/ पिशव्या किंवा कापड यापैकी जे असेल ते 4)मतपत्रिकांच्या हिशोबाचा लिफाफा 5)कागदी मोहोरांच्या हिशोबाचा लिफाफा 6)मतदान केंद्राध्यक्षांच्या प्रतिज्ञापनाचा लिफाफा 7)मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनीचा लिफाफा 8)”सांविधानिक लिफाफा”असे लिहिलेले आठ लिफाफ्याचे पहिले पाकीट 9)”असांविधानिक लिफाफा” असे लिहिलेल्या सहा लिफाफ्याचे दुसरे पाकीट 10)निवडणूक साहित्य इत्यादीच्या आठ बाबी असलेले तिसरे पाकीट 11)इतर बाबी असल्यास, सर्व वस्तूंचे चौथे पाकीट. (टिप-१ वर उल्लेख केलेल्या एखाद्या लिफाफ्यामध्ये विवरणपत्र ठेवण्याची आवश्यकता नसली तरी सुध्दा त्या लिफाफ्यामध्ये एका चिठ्ठीवर “काही नाही” असे लिहावे आणि लिफाफे तयार करावे)
मतदान संपल्यानंतर वरीलप्रमाणे सर्व साहित्य मोहरबंद करून तयार ठेवा. सर्व साहित्य सोबत सुस्थितीत घेतल्याची खात्री करा. परतीचा मार्ग प्रवासानुसार आपणांस घेण्यासाठी येणाऱ्या अधिकृत वाहनांनीच प्रवास करावा. सोबत पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी ठेवावेत. टेबलनिहाय द्यावयाचे साहित्य लावून घ्यावे. सर्व साहित्य परत करून पोच व कार्यमुक्त आदेश घेऊनच साहित्य स्वीकृती केंद्र सोडावे.
निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान
निवडणुकीच्या कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतपत्रिकेद्वारे आपले मत नोंदविता येईल. टपाली मतपत्रिका मागणीचा नमुना 12 मधील अर्ज पहिल्या प्रशिक्षणदिवशी उपलब्ध करून देण्यात येईल. हा अर्ज भरून संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दुसऱ्या प्रशिक्षणाचे वेळी सादर करण्यात यावा. प्रशिक्षणाच्या ठिकाणी टपाली मतपत्रिकासाठीचे सहायता केंद्र तयार करण्यात येईल, त्या ठिकाणी टपाली मतदानाबाबत आपणास कार्यवाही करता येईल.
या लेखामध्ये महत्त्वाच्या सूचना थोडक्यात नमूद केल्या आहेत. सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी आयोगाच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये आलेल्या अडी-अडचणीबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे, आत्मविश्वासाने आणि संघभावनेने पार पडेल, याची खात्री आहे.