हेडलाइन

नागपूर येथील डॉ.आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या आर्थिक अनियमिततेच्या चौकशीचे निर्देश

Summary

मुंबई, दि. 16 : सामाजिक न्याय विभागांतर्गत २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कारभारात प्रचंड अनियमितता आढळल्याने याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.  मंत्रालय येथे संस्थेच्या […]

मुंबई, दि. 16 : सामाजिक न्याय विभागांतर्गत २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कारभारात प्रचंड अनियमितता आढळल्याने याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

 मंत्रालय येथे संस्थेच्या संचालक मंडळाची आढावा बैठक श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

बैठकीदरम्यान सन २०१८-१९ चा लेखापरीक्षण अहवाल संचालक मंडळापुढे ठेवण्यात आला. TACS & कंपनी या सनदी लेखापाल संस्थेने केलेल्या लेखापरीक्षणा (२०१८-१९) मध्ये संचालक मंडळाने त्रुटींचे निरीक्षण नोंदवले.

 संस्थेला मागील ३ वर्षात दिलेल्या १६ कोटी रुपये खर्चाचा हिशोब समाधानकारक नसल्याचे सनदी लेखापाल यांच्या अहवालात दिसून आले. यामध्ये निविदा प्रक्रिया न राबविता कामे देणे अथवा निविदा प्रक्रिया चुकीची राबविणे, खर्चाच्या देयकांवर संबंधितांच्या स्वाक्षऱ्या नसणे किंवा त्यासोबतचे व्हाऊचर न ठेवणे, खर्चाचा मेळ न लागणे, सनदी लेखापाल यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन न देणे या बाबी समोर आल्याने श्री.मुंडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

या  प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रधान सचिव, सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखाली  चौकशी समिती नेमण्यात यावी व चौकशी समितीमध्ये आयुक्त, समाज कल्याण, पुणे व महासंचालक, बार्टी यांचा समावेश करावा. तसेच समितीने एक महिन्यात चौकशी अहवाल दिल्यानंतर तो पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.मुंडे यांनी दिले आहेत.

 संचालक मंडळाच्या बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री विश्वजीत कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, ‘बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *