ठाणेदार दीपक पाटील यांचे ग्रामस्थांना आवाहन.. स्वतःच एक पोलीस व्हा!
माझ्या गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामस्थांना पोलीस स्टेशनचा ठाणेदार म्हणून कळकळीची विनंती करतोय..
खर तर पोलीस विनंती करीत नाही तर नियम व कायद्याच्या भाषेने बोलतो.
पण कोरोनाने मात्र कायदा,नियम,दंडुकशाही यापलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडले आहे.
एरवी एखादया गावात,विशिष्ट भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की आम्ही पोलीस तात्काळ जाऊन त्यावर नियंत्रण मिळवितो.
कारण परिसर लहान व प्रमाणात मनुष्यबळ त्यामुळे ते शक्य होते.
कोरोनाने मात्र पूर्ण परिसरच व्यापला आहे.
पोलीस तरी कुठे कुठे पुरतील?
आता वेळ आली आहे स्वतःच पोलीस व्हायची व स्वतःवरच नियंत्रण ठेवायची.
*तुम्ही स्वतः एक पोलीस व्हा व तुमच्या स्वतःवर नियंत्रण मिळविणे एवढीच तुमची जबाबदारी घ्या*
होय,ही आता गरज आहे..
काही दिवसापूर्वी आपल्याशी हसत हसत बोलणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी येते आणि आपल्याला त्याच्या अंत्यसंस्कारालाही जाता येत नाही..
न भूतो न भविष्यती असे संकट..
काळ आला आहे पण वेळ येऊ द्यायची नाही..
माझं घर,माझं गाव,माझा तालुका आणि माझा जिल्हा जर कोरोनाच्या तावडीत येऊ द्यायचा नसेल तर मला जाणीव ठेवून वागावे लागेल ही गुणगाठ आधी मनाशी बांधा.
काही जणांच्या विशेषतः काही तरुणांच्या निष्काळजीपणामुळे ही महामारी आपल्या दारात येऊन पोहचली आहे..
आज टिंगलटवाळी करणारे, कोरोनाला मजाक समजणारे व पोलीस आल्यावर त्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणारे बरेच जण आपल्याच कुटुंबातील कोरोना रुग्णासाठी बेड व रेमडीसीवर इंजेक्शन घेण्यासाठी जीव मुठीत घेऊन दवाखाने फिरू शकतात..
आज परिस्थिती बिघडू नये यासाठी हवा फक्त समजूतदार पणा!
बाहेर विनाकारण पडताना एकवेळ घरात नटखट खेळणाऱ्या बाळाकडे व आयुष्याची शेवटची सफर आनंदाने करणाऱ्या म्हाताऱ्याकडे नक्की पहा..कदाचित तुमच्या चुकीमुळे तुम्ही घरात कोरोना आणून एकाची सुरुवात व एकाचा शेवट खराब करू शकता..
काठी घेऊन तुमच्यामागे पळताना आम्हालाही वाईट वाटते.
तेव्हा मात्र आम्हीही खूप हताश होतो..
खूप वाटते,अशा संकटकाळी तरी लोकांनी जबाबदारीचे भान ठेवावे…
असे तर नाही ना,
कोरोनाची भयानकता फक्त पोलिसांना समजली आहे आणि जनतेला नाही…
कोरोना पसरू नये ही जबाबदारी फक्त पोलिसांनीच नाही तर ती समुदायाची,कुटुंबाची व शेवटी स्वतःची आहे.
स्वतः एक पोलीस व्हा..स्वतःच नियम पाळा, इतरांना सांगा..
थोड्या दिवसाचा हा काळ आहे..
संयम बाळगा..
पोलिसांनी दिलेल्या सूचना पाळा..
आपले येणारे सुंदर आयुष्य सुखाने,आनंदाने जगायचे असेल तर आज काही गोष्टींवर नियंत्रण ठेवा.
शेवटी एकच,
*तुम्ही स्वतः एक पोलीस व्हा,फक्त स्वतःवर नियंत्रण मिळवा..*
अपेक्षा करतो,
या कठीण काळात,गाव एक होऊन एकोप्याने निर्णय घेतील,घरात थांबतील,मास्क वापरतील,अंतर ठेवतील व कोरोनाचा पराभव करतील..
आपलाच,
*श्री.दीपक पाटील,*
*ठाणेदार,पो स्टे गोबरवाही.*