BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

…अखेर जिल्हाधिकाऱ्यांना सापडला कार्यालयातून बाहेर पडण्यासाठी मुहूर्त!

Summary

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वात पुढे राहून काम केले पाहिजे. मात्र, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आपल्या कार्यालयातच असतात. शुक्रवारी त्यांनी पहिल्यांदा शहरातील ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. चंद्रपूर – कोरोनाच्या काळात नागरिक मरणाच्या दारात उभे असताना केवळ […]

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वात पुढे राहून काम केले पाहिजे. मात्र, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आपल्या कार्यालयातच असतात. शुक्रवारी त्यांनी पहिल्यांदा शहरातील ऑक्सिजन प्लांटला भेट दिली.
चंद्रपूर – कोरोनाच्या काळात नागरिक मरणाच्या दारात उभे असताना केवळ औपचारिकतेच्या बैठका आणि अपवाद वगळता सहसा आपल्या कार्यालयातच वेळ काढणारे जिल्हाधिकारी, अशी ओळख निर्माण झालेले अजय गुल्हाने यांना अखेर बाहेर पडण्याचा मुहूर्त सापडला आहे. शुक्रवारी बाहेर पडत त्यांनी एमआयडीसी येथील आदित्य ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑक्सिजनचे उत्पादन किती होते, त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते, ही प्रक्रिया समजून घेतली. कोरोनाच्या काळात लोक उपचाराअभावी मरत असताना, कार्यालयातच वेळ काढणारे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आकस्मिक भेट हा अनेकांसाठी आश्चर्याचा मोठा धक्काच होता.
खेमणारांच्या अपेक्षांचा गुल्हाने यांना फटका -ऑगस्ट 2020 मध्ये डॉ. कुणाल खेमणार यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. खेमणार हे कोरोनाची स्थिती अत्यंत जबाबदारीने हाताळत होते. वेळोवेळी बाहेर जाऊन ते कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना देत. त्यांच्या अशा आकस्मिक भेटीमुळे संबंधित यंत्रणा देखील दक्ष असे. कधी ते कोविड केअर केंद्र तर कधी जिल्हा सामान्य रुग्णालय तर कधी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन पाहणी करून येत. ते स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना ही स्थिती हाताळण्यास मोठी मदत देखील झाली होती. आजूबाजूला काय घटनाघडामोडी सुरू आहेत, त्याचे समाजमनावर काय प्रतिबंध पडत आहेत, याचाही आढावा ते घेत. यातच सायंकाळी दररोज न चुकता जनतेसाठी ते व्हिडिओ संदेश प्रसारित करायचे. यात ते जनतेला सूचना, मार्गदर्शन करायचे तसेच कुठे काही घटना घडल्या असतील त्यावर योग्य ते भाष्य करायचे. यामुळेच खेमणार यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळेच त्यांच्या अचानक बदलीमूळे सामान्य नागरिकांत संतापाची लाट निर्माण झाली होती. याचा विरोध सुरू झाल्याच्या काहीच दिवसांत 11 ऑगस्टला अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी ते मुंबईत जलस्वराज्य विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. खेमणार यांनी चंद्रपुरकरांवर जी छाप सोडली त्यामुळे कोरोनाच्या कठीण काळात गुल्हाने यांची नेतृत्वक्षमता तपासली जाणार हे निश्चित होते. 11 ऑगस्टला गुल्हाने यांनी सूत्रे हाती घेतली त्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या ही 898 तर कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर याच्या वीस दिवसांनी म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी ही संख्या तब्बल 2763 तर मृतांचा आकडा हा 29 पर्यंत पोचला. म्हणजे मृतांच्या संख्येत तब्बल सहा पट वाढ झाली तर रुग्णांच्या संख्येत थेट तीन पटीने वाढ झाली होती. कार्यालयीन कामकाजाची चौकटबद्ध प्रतिमा -यानंतर देखील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत गेले. मात्र, जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावर स्वतः पुढाकार घेत यात फारसे काही केले नाही. ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी आरोग्य यंत्रणेवर सोपवली. औपचारिकता म्हणून दररोज कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेणे, लोकप्रतिनिधिंशी कार्यालयात चर्चा करणे, वरिष्ठांना ऑनलाइन मिटिंगमध्ये जिल्ह्याची माहिती देणे, विविध संघटनांचे निवेदन स्वीकारने अशी कार्यालयीन चौकटबद्ध पद्धती त्यांनी स्वीकारली. जे काही प्रश्न असतील ते कार्यालयातच सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बाकी अपवाद वगळता ते स्वतःहुन फारसे बाहेर पडलेच नाहीत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असलेल्या ब्रम्हपुरीत पूर आला असता त्यांनी तिथे धाव घेतली होती. नागपूरनिवासी पालकमंत्री वडेट्टीवार जेव्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात त्यावेळी पाहणी करताना गुल्हाने सोबत असतात. या व्यतिरिक्त ते कार्यालयात असतात. कोरोनाच्या काळात लोकांना उपचार मिळत नाही आहे, बेडची कमतरता आहे, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे असे चित्र असताना गुल्हाने यांना बाहेर पडून नेमकी काय स्थिती आहे, त्यात काय कमी आहेत, त्यात तातडीने सुधारणा कशा होतील हे जाणून घेण्याची तसदी घेत नसल्याने गुल्हाने सध्या टीकेचे पात्र ठरले आहे. त्यांच्याविरोधात नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करीत आहेत. जबाबदारी संबंधित विभागाची -दररोज कोरोनाबाबत घडत असलेल्या दुर्दैवी घटना प्रसारमाध्यम, सोशल मीडियावर येत असतात, त्याचे प्रतिबिंब गुल्हाने यांच्या कामकाजात पडत नाही. हे जिल्ह्यातील नागरिकांचे दुर्दैव आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी असल्या घटनांची माहिती घेण्यास प्रसार माध्यमे संपर्क करतात त्यात गुल्हाने थेट संबंधित विभागाशी संपर्क करा, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आणि जबाबदारी आहे असे म्हणत आपली जबाबदारी झटकून टाकतात. प्रत्येक विभागाची जबाबदारी त्यांनी ‘फिक्स’ केली असल्याने त्यांच्या अखत्यारीत मुख्य असा कुठलाही विभाग उरला नाही. मात्र प्रत्येक विभागाला निर्देश देऊन काम करून घेण्याचा अधिकार हा सीआरपीसी कलम 133 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना असतो ते जिल्हा दंडाधिकारी आहेत याचा विसर त्यांना पडला असावा. कारण अशा प्रकारचे निर्णय त्यांनी घेतल्याचे जाहीर असे उदाहरण नाही. हे पूर्वीच झाले असते तर…?शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी एमआयडीसीतील आदित्य ऑक्सिजन प्लांटला आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी ऑक्सिजनचे किती उत्पादन होते, त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते याबाबत माहिती घेतली. कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असून त्याचा जास्तीत जास्त पुरवठा करण्यात यावा असे निर्देश त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. ऑक्सिजनची उत्पादन क्षमता वाढविण्यात यावी व यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी त्यांना दिले. हे चित्र आशादायी आहे मात्र हे प्रयत्न या पूर्वीच झाले असते तर अनेकांचे जीव वाचविता आले असते. सप्टेंबर महिन्यात चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात ज्या दोन ऑक्सिजन प्लांटला मंजुरी त्यातून अनुक्रमे 350 आणि 240 अशा 590 बेड्सना थेट ऑक्सिजनचे कनेक्शन उपलब्ध होणार होते. चार आठवड्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते आज चार महिने लोटून देखील पूर्ण क्षमतेने हे प्लांट सुरू झाले नाही. वैद्यकीय महाविद्यालयातील 350 पैकी जे बेड ऑक्सिजन कनेक्शनने जोडल्याचा दावा केला जात आहे त्याला सिलिंडरने पुरवठा करावा लागतोय ही वास्तविक स्थिती आहे. तर दुसऱ्या प्लांटला exlplosive विभागाची परवानगीच मिळाली नाही. त्याच्या बाजूला विजेचा खांब असल्याने हा अडसर आला. हे प्लांट टाकण्यापूर्वी त्याची कल्पना आरोग्य यंत्रणेला नाही आली का? इतक्या क्षुल्लक गोष्टींसाठी 240 बेडना ऑक्सिजन मिळू शकले नाही हे दुदैवी आहे. आरोग्य यंत्रणेची हे अक्षम्य चूक आहेच मात्र याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी त्वरीत पाऊल उचलले असते तर अशी वेळ आली नसती. आज कोरोना रुग्णांची संख्या 14 हजारांच्या वर गेलीय, मृतकांची संख्या साडे सातशेच्या घरात गेली आहे. एकूण तपासणीपैकी जवळपास 50 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे स्थिती किती स्फोटक झाली आहे याची कल्पना करण्यासारखे आहे. अशा काळात जिल्हाधिकारी यांनी स्वतःहुन पुढाकार घेत थेट भेट देऊन पाहणी केली हे आशादायक चित्र आहे.जिल्हावासियांना हा विश्वास गुल्हाने यांनी पूर्वीच देणे आवश्यक होते. मात्र, हे चित्र अपवाद ठरू नये. आज जिल्हाधिकारी यांनी जनतेला आश्वस्त करणे गरजेचे आहे, त्यांचा विश्वास संपादित करणे आवश्यक आहे. त्यांच्या सूचना, भावनांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे. मात्र यासाठी त्यांना आपली चौकटबद्ध पद्धती मोडून बाहेर पडावे लागेल. तरच हे कोरोनाचे चित्र पालटू शकेल.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *