साकोली येथील कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करा – विधासभा अध्यक्ष नाना पटोले
Summary
नागपूर, दि. 21 :साकोली येथील प्रस्तावित कृषी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या चाळीस हेक्टर जागेचा संपूर्ण प्रस्ताव येत्या दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र विधासभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. प्रस्तावित कृषी महाविद्यालय साकोली येथील आलेबेदर येथे सुरु करण्यात येत आहे. या […]
नागपूर, दि. 21 :साकोली येथील प्रस्तावित कृषी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या चाळीस हेक्टर जागेचा संपूर्ण प्रस्ताव येत्या दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र विधासभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.
प्रस्तावित कृषी महाविद्यालय साकोली येथील आलेबेदर येथे सुरु करण्यात येत आहे. या महाविद्यालयासाठी चाळीस हेक्टर जागेची आवश्यकता असून यासंबंधिचा प्रस्ताव महसूल विभागातर्फे वन विभागाला सादर करण्यात आला आहे. वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जागेची संयुक्त पाहणी करुन सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यावेळी नाना पटोले यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कृषी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, प्रादेशिक वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत सुके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मून, साकोलीचे उप विभागीय अधिकारी मनीषा दांडगे, भंडारा वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. डी. भलावी आदी उपस्थित होते.
साकोली येथे कृषी महाविद्यालय सुरु करण्यात येत असून यासाठी महसूल विभागातर्फे मौजा आलेबेदर (रिठी) या गावातील चाळीस हेक्टर जागेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या जागेसंदर्भात वन विभागातर्फे वनसदृष्य जंगल अथवा वन विभागाच्या नोंदीनुसार मालकीहक्कासंदर्भात तपासणी करुन या संदर्भातील प्रस्ताव येत्या तीन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्याच्या सूचना करताना विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी जागेच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या परवानगीसंदर्भातही वन विभाग व महसूल विभाग यांनी संयुक्तपणे जागेची पाहणी करुन शासन मान्यतेसाठी प्रस्ताव तयार करावा, असेही या बैठकीत ठरले.
जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रस्तावित कृषी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या जागेसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली.
*****