मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनी घेतला मेट्रोच्या प्रगतीपथावरील कामांचा आढावा, मेट्रो मार्गिका चाचणी इंजिनची केली पाहणी
मुंबई, दि. २० :- मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी असा आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई मेट्रोच्या अंधेरी एल-सेव्हन स्थानक, अकुर्ली मेट्रो स्थानक, दहिसर रेल्वे उड्डाण पूल (मेट्रो रेल ब्रिज), चारकोप मेट्रो डेपो आणि डी.एन. नगर मेट्रो स्थानक येथे भेट देऊन कामांची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी अंधेरीतील प्रस्तावित गुंदवली आणि त्यानंतर कांदिवली येथील मेट्रो स्थानकांच्या कामांची पाहणी केली, तसेच विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
चारकोप मेट्रो डेपोतील मेट्रोच्या इंजिनची मेट्रो मार्गिंकांवरील चाचणीच्या तयारीबाबतही या भेटीत पाहणी केली.
यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह तसेच मेट्रोशी निगडीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी कामांचा प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विविध मुद्दयांबाबत निर्देश दिले. प्रकल्पातील चारकोप मेट्रो डेपोत मेट्रो मार्गिकांवरील चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मेट्रोच्या इंजिनचीही त्यांनी माहिती घेतली. दहिसर येथे उभारण्यात येत असलेल्या मेट्रोच्या पुलाच्या कामांचीही प्रत्यक्ष पाहणी केली.
उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रकल्पातील प्रगतीपथावरील कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ही कामे दर्जेदार व्हावीत, तसेच ती वेळेत पूर्ण करण्यात यावीत, या दृष्टीनेही मुख्यमंत्र्यांनी काही निर्देश दिले.
००००
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491