परिचारिकांना अनुज्ञेय भत्ते मिळण्यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
Summary
मुंबई, दि. 10 : वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्याच्या कोविड-19 परिस्थितीत डॉक्टरांबरोबरच परिचारिकाही सतत काम करीत आहेत. परिचारिकांना अनुज्ञेय भत्ते मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग वित्त विभागाकडे पाठपुरावा करेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण […]
मुंबई, दि. 10 : वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्याच्या कोविड-19 परिस्थितीत डॉक्टरांबरोबरच परिचारिकाही सतत काम करीत आहेत. परिचारिकांना अनुज्ञेय भत्ते मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग वित्त विभागाकडे पाठपुरावा करेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गंत कार्यरत परिचारिकांच्या प्रश्नांबाबत बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सरचिटणीस कमल वायकोळे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या परिचारिका प्रतिनिधी उपस्थित होत्या.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, परिचारिका या सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सेवा करीत असतात. त्यामुळे त्यांना अनुज्ञेय असलेले भत्ते, धुलाई भत्ता आणि इतर अनुषंगिक भत्ते वेळोवेळी मिळणे आवश्यक आहे. आपण स्वत: यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करु.
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत लवकरच अधिपरिचारिका संवर्गामध्ये भरती करण्यात येणार आहे. तसेच परिचारिकांना रुग्णालयात लागणारे साहित्य, वस्तू, यंत्रसामुग्री सर्व संस्थांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परिचारिकांना मदतनीस म्हणून अनेक चतुर्थश्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते त्यामुळे या विभागामार्फत लवकरच चतुर्थश्रेणीची रिक्त पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मुभा देण्यात आल्याची माहितीही यावेळी श्री.देशमुख यांनी परिचारिकांना दिली.