महाराष्ट्र

गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांतील पोलिसांसोबत गृहमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी. नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या पोलिसांना दिली उमेद : इतिहासात प्रथमच दुर्गम भागात पोहोचले गृहमंत्री

Summary

गडचिरोली : नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस जवानांची उमेद वाढविली. देशमुख यांनी शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी […]

गडचिरोली : नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस जवानांची उमेद वाढविली. देशमुख यांनी शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरतीताई हेलीकॉप्टरने पातागुडम येथे पोहोचले. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते.

दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच गृह मंत्री येत असल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलिसांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली.

या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलीस घरापासून, आपल्या आई-वडिलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळापासून दूर असाल, याची मला जाणीव आहे. तेव्हा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटलं की मी तुमच्यात यायला हवं. माझं पोलीस दल ड्युटीवर असताना मी माझ्या घरात, माझ्या पत्नी-मुलांसमवेत दिवाळी साजरा करत बसलो असतो तर माझ्या मनाला रुखरुख लागली असती. म्हणून ठरवलं की तुमच्याकडं यायचं आणि काही वेळ तरी तुमच्या सोबत घालवायचा.

गडचिरोली पोलीस क्षेत्राचे उपमहानिरिक्षक संदीप पाटील म्हणाले, या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था बराकमध्ये केली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत राहता येत नाही. गृहमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. पोलिसांच्या इतर अडचणी समूजन घेत सरकार सदैव पोलीस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली.

 गृह मंत्र्यांच्या ऐतिहासिक भेटीने पोलीस कर्मचारी भारावून गेले

 गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम आणि टेकड्यांचा प्रदेश असलेल्या पातागुडम येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या ऐतिहासिक भेटीने पोलीस कर्मचारी भारावून गेले. येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची देशमुख दाम्पत्यांने आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. हे ठिकाण गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून तीनशे किलोमीटर अंतरावर छत्तीसगढ सीमेलगत आहे.

संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *