राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली जलसंधारण कामाची पाहणी नवीन कामांचे तात्काळ प्रस्ताव सादर करून सुरू असलेली सिंचनाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.22, सिल्लोड तालुक्यातील अंजना , चारणा या उपनद्यामध्ये सुरू असलेले सिंचन कामांची महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवार ( दि.22 ) रोजी प्रत्यक्ष कामांवर जावुन पाहणी केली. सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील प्रमुख व उपनद्यामध्ये नवीन सिंचनाची कामे करता येईल का यासाठी सर्वेक्षण करून नवीन सिंचनाच्या कामांसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा , सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी नियमाप्रमाणे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे यासोबतच तालुक्यातील सुरू असलेले सिंचनाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
तालुक्यातील दिडगाव – उपळी शिवारातील अंजना नदी वर कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या कामास सुरुवात झाली असून सावखेडा येथील चारणा नदीवरील सुरू असलेल्या 2 कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात सुरू आहे. शनिवार ( दि.22 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुरू असलेल्या या कामाची प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांशी बोलत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वरील निर्देश दिले.
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, डॉ. संजय जामकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यतीन कोठावळे, जलसंधारण अधिकारी आर. पी. दांडगे आदिंची उपस्थिती होती.
सिल्लोड – सोयगाव तालुक्यात जलसंधारण विभाग अंतर्गत जवळपास 36 सिमेंट बंधाऱ्याच्या कामासाठी मंजुरी मिळालेली असून येत्या 4 दिवसात हे कामे सुरू होईल अशी माहिती देत सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी यासाठी मोठ्या प्रमाणावर सिंचनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सदरील कामे शेतकऱ्यांच्या हिताची असल्याने शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.