स्वयंघोषित देशभक्तांची देशभक्ती आणि वास्तव (भाग-१) -चंद्रकांत झटाले यांचे विचार
Summary
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8.मे.2021 आज देशात देशभक्तीची नवीन व्याख्या स्वयंघोषित देशभक्तांकडून समाजात रुजविली जातेय. हे देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणार्यांना मात्र कुणीच त्यांच्या देशभक्तीचे पुरावे मागत नाही. वारंवार नविन पिढीच्या मेंदूवर ह्या गोष्टींचा मारा करून चांगला मेंदू विकृत केल्या […]
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8.मे.2021
आज देशात देशभक्तीची नवीन व्याख्या स्वयंघोषित देशभक्तांकडून समाजात रुजविली जातेय. हे देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणार्यांना मात्र कुणीच त्यांच्या देशभक्तीचे पुरावे मागत नाही. वारंवार नविन पिढीच्या मेंदूवर ह्या गोष्टींचा मारा करून चांगला मेंदू विकृत केल्या जातोय. अनेक महापुरुषांबद्दल त्यांच्या मनात द्वेष भरला जातोय. प्रत्येकाला प्रश्न विचारणाऱ्या ह्या महाभागांच्या प्रश्नांना प्रतिप्रश्नही कुणीच करत नाही आणि यामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतांनासुद्धा कुणीच दिसत नाही. आज आपण ह्या स्वयंघोषित देशभक्तांची देशभक्ती आणि वास्तव पुराव्यांसह जाणून घेणार आहोत. विषय मोठा असल्याने दर गुरुवारी एक भाग असे काही भागात हे वास्तव मी आपल्यासमोर मांडणार आहे.
काही विशिष्ट कट्टरवादी संघटनांकडून गेली अनेक वर्षे समाजात काही प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित केले जात आहेत. त्यातही गेल्या 6-7 वर्षांपासून तर ते प्रश्न अधिक तीव्रतेने विचारल्या जात आहेत. देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण हे सुद्धा नवीन व्याख्येनुसार जाहीररीत्या वारंवार सांगितल्या जातंय. यामुळे जे न्यूट्रल लोक आहेत, काही अशिक्षित आहेत किंवा नवीन पिढी आहे त्यांच्या विचारांच्या दिशा बदलण्याचं व त्यांच्या मनात महापुरुषांबद्दल द्वेष पेरण्याचं काम हे प्रश्न आणि ह्या व्याख्या करत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात कुणी किती योगदान दिले यावरून त्याची देशभक्ती ठरली पाहिजे.ज्यांचं योगदान शून्य आहे त्यांनी किमान गप्प बसने अपेक्षित आहे, परंतु हेच लोक जेव्हा देशभक्तांनी देशद्रोही सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना आरसा दाखविणे आवश्यक वाटते.
भारतात हिंदू महासभेची स्थापना 1916 साली झाली आणि 27 सप्टेंबर 1925 ला डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. स्थापणेनंतर संघ हे केवळ हिंदूंचे संघटन आहे एवढेच स्वयंसेवकांना माहित होते, परंतु त्याचा नेमका उद्देश काय? आणि त्या उद्देशाप्रत जाण्यासाठी कृती कोणती करायची? याबद्दल संघ स्वयंसेवकांमध्ये संभ्रम होता हे अनेक माजी संघसेवकांनी नोंदवून ठेवलेले आहे. तो संभ्रम आजही आहेच. आज यांच्याच पोटशाखा असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्वदेशी जागरण मंच ह्या संघटना भारतीयांच्या देशभक्तीवर सवाल उठवतांना दिसतात. मुस्लिमांच्या भितीसोबतच अखंड हिंदूराष्ट्राचे स्वप्न ही हे लोक दाखवत आहेत.यांच्या विचारांचे विरोधी म्हणजे देशद्रोही आणि यांच्या विचारांचे समर्थक म्हणजे देशभक्त अशी यांची व्याख्या आहे. या स्वयंघोषित देशभक्त, त्यांचे नेते, त्यांचे आदर्श हे कीतपत देशभक्त होते हे पुढील माहितीवरून स्पष्ट होईलच.
स्वतःच्या चुका झाकण्यासाठी हे लोक विरोधकांना टारगेट करतात. त्यांना प्रश्न विचारतात. अशे प्रश्न विचारतांना ह्यांचं सरदार पटेल, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस व ईतर सशस्त्र क्रांतीकारकांबद्दलचं प्रेम मोठ्या प्रमाणावार उतू जाते. ज्या नेताजीं सुभाषचंद्र बोसांचा या कट्टरवाद्यांना इतका पुळका येतो तेच हिंदू महासभा व आरएसएसचे लोक नेताजींसोबत दूरदूरपर्यंत अजिबात संबंध येणार नाही याकरिता दक्ष असत. कारण नेताजींसारख्या क्रांतिकारकांसोबत आपली भेट झाली हे जर ब्रिटिशांना कळलं तर आपण ब्रिटिशांच्या ब्लॅकलिस्ट मध्ये जाऊ. ब्रिटिशांची नाराजी ओढवून घेऊ. त्यामुळे अशा भेटी होणार नाहीत याची ते पुरेपूर काळजी घेत. आपण उदाहरण च घेऊयात. त्रिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी बाळाजी हुद्दार नावाच्या एका संघ-स्वयंसेवकाला माझी सरसंघचालक हेडगेवारांशी भेट घालून द्या म्हणून विनंती केली. त्यानुसार हुद्दार नेताजींचे एक सचिव श्री.शहा यांना घेऊन नाशिकला आले. कारण हेडगेवार त्या वेळेस नाशिकला बाबासाहेब रघाटे यांच्या घरी निवासाला होते. हुद्दार पुढे सांगतात, ’शहा बाहेर थांबले. मी आत गेलो. तेथे हेडगेवारांचा इतर स्वयंसेवकांशी हास्यविनोद सुरु होता. मी विनंती केल्यावर स्वयंसेवक बाजूला निघून गेले. मी माझ्या भेटीचा उद्देश सांगितला. नेताजी तुम्हाला भेटायला फार उत्सुक आहेत. कशासाठी ते मात्र त्यांनी मला सांगितले नाही.’ त्यावर डॉ.हेडगेवार हुद्दारांना म्हणतात, ’मी खूप आजारी आहे. त्यामुळे नाशिकला आलो आहे.’ तरीही हुद्दार त्यांना समजविण्याचा प्रयत्न करतात व या उच्चपदस्थ काँग्रेसच्या नेत्याला भेटण्याची संधी आपण गमावू नये अशी विनंती करतात. तरीही हेडगेवार, ’मी फार आजारी आहे. मी फार आजारी आहे, मी बोलूही शकत नाही.’ हेच वारंवार कारण सांगत राहतात. शेवटी हुद्दार गयावया करतात आणि सुचवतात , किमान माझ्याबरोबर आलेल्या शहांना तरी तुमची खरी अडचण समजावून सांगा. नाहीतर मीच तुमची व नेताजींची भेट होऊ दिली नाही असा त्यांना गैरसमज होईल. ती सूचना ऐकून हेडगेवार लगेच आडवे पडतात आणि म्हणतात, ’बाळाजी मला अगदी बोलण्याइतपतही शक्ती नाही. मी खूप आजारी आहे. कृपा करून… ’ बाळाजी हुद्दार खोलीतून बाहेर पडतात आणि परत डॉ. हेडगेवारांच्या खोलीतून त्यांचा स्वयंसेवकांसोबतचा हास्यविनोदाचा आवाज हुद्दारांच्या कानी पडतो.
कधीकाळी सरसंघचालक डॉ. हेडगेवारांचे निकटचे सहकारी असलेल्या श्री. मा. ह. हातिवलेकर यांनी ’अक्षर वैदर्भी’च्या 1991 च्या अंकात ’एक सहप्रवास; सावरकर-संघ मार्क्सवाद’ या लेखात बाळाजी हुद्दार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ. हेडगेवार यांच्या तथाकथित भेटीबाबत सांगितलेल्या प्रसंगाची आपल्या लेखात पुष्टीच केली आहे. या लेखात ’नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बाळाजी हुद्दार मार्फत संघाच्या सहकार्याच्या अपेक्षेने पाठविलेल्या दूताची भेटही डॉ.हेडगेवारांनी आजारी असल्याचे सोंग घेऊन टाळली’ हे मा.ह.हातिवलेकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ना.ह.उर्फ नानाजी पालकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते व डॉ. हेडगेवारांचे चरित्रकार यांच्याही ’ डॉ.हेडगेवार प्रेरक जीवन प्रसंग’ या पुस्तकात नेताजी सुभाषचंद्र बोसांनी दोन वेळा डॉ.हेडगेवारांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु तो दोन्हीही वेळा हुकला असे म्हंटले आहे. हेडगेवारांनी भेट टाळली असं लिहिण्याऐवजी त्यांनीही भेट हुकली असं जरी लिहिलं तरीसुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोसांनीच हेडगेवारांच्या भेटीसाठी प्रयत्न केले होते डॉ.हेडगेवारांनी नाही ही गोष्ट स्पष्ट होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक नेताजी सुभाषचंद्र बोसांची साधी भेट घ्यायची हिम्मत करत नाहीत आणि त्यांचेच अनुयायी सुभाषबाबूंना न्याय मिळाला नसल्याची ओरड करतात, किती हा विरोधाभास? आणि हेच लोक आज देशभक्ती कशी करावी याचे धडे देतांना दिसतात.
ब्रिटिश सरकारने जेव्हा आझाद हिंद सेनेच्या पराभूत सैनिकांवर आणि अधिकार्यांवर दिल्लीच्या लाल किल्ल्यात जेव्हा देशद्रोहाचा खटला दाखल केला त्यावेळी हिंदू महासभा किंवा आरएसएस चा कुणीच व्यक्ती त्यांच्या मदतीकरिता आला नाही. पंडित नेहरू अनेक वर्षांनंतर अंगावर काळा कोट चढवून त्या सैनिकांच्या बाजूने वकील म्हणून उभे राहिले. स्वातंत्र्यानंतर सुद्धा नेहरूंच्या सरकारने त्या आझाद हिंद सेनेच्या सर्व सैनिक व अधिकार्यांचे पुनर्वसनही केले. ह्या गोष्टी हे लोक कधीच बोलत नाहीत.
ज्या सरदार पटेलांबद्दल अत्यंत आदर-सन्मान असल्याचे हे लोक नेहमी दाखवतात मात्र त्याच सरदार पटेलांच्या नावाने असलेल्या स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम ठेवण्यात आले. नविन स्टेडियम बांधून त्याला मोदींचे नाव देण्यास कुणाचाही विरोध असण्याचे कारण नव्हते.परंतू सरदार पटेलांचा बदला घेण्याच्या उद्देशाने तर ही घटना घडविण्यात आली नाही अशी शंका घ्यायला जागा आहे. कारण याच सरदार पटेलांनी एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ही संघटना देशद्रोही आहे म्हणून बंदी घातली होती. सरदार पटेलांच्याच निर्देशाने 14 नोव्हेंबर 1948 रोजी भारत सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली होती. त्यात संघ हा राष्ट्रविरोधी (अँटी नॅशनल) आहे असे स्पष्टपणे लिहिलेले होते.नंतरच्या काळात कुणावरही बंदी असू नये या उदात्त धोरणाला अनुसरून ही बंदी उठविण्यात आली. ही बंदी उठवत असतांना त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर संघाने एक करार केला. या करारामधील एक अट अशी होती की , ’संघाने आपल्या घटनेतून व कृतीतून भारतीय राज्यघटना व तिरंगा राष्ट्रध्वज यांचा आदर व बांधिलकी निःसंशय रित्या दाखवून दिली पाहिजे. त्यांचा अपमान करु नये. ( “The R.S.S. leader has undertaken to make the Ioyalty to the Union Constitution and respect for the National Flag more explicit in the Constitution of the R.S.S.” Govt. Communique Dated 11 th July 1949 announcing the lifting of ban; Rashtriya Swayamsevak Sangh: by Deshraj Goyal, New Delhi. pg.205) या वरील अटीवरून आपल्याला काय आकलन होते? असं तुम्ही कुणाला म्हणाल की तुझ्या बोलण्या-वागण्यातून भारतीय राज्यघटना आणि तिरंग्याचा अपमान व्हायला नको? जे अपमान करत असतील त्यालाच ना?
असंख्य भारतीय क्रांतीकारकांनी हौतात्म्य पत्करुन व अनेक महापूरुषांनी आपले सर्वस्व अर्पूण मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाला म्हणजेच 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाला आरएसएस ने काळा दिवस पाळला. संपूर्ण देश स्वातंत्र्योत्सव साजरा करत असताना हे लोक हा ऐतिहासिक क्षण काळा दिवस म्हणून पाळत होते हीच यांची देशभक्ती. भारतीय राज्यघटनेचा, भारतीय राष्ट्रध्वजाचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा अपमान करणारे हेच लोक आज आपल्याला देशभक्ती शिकवत आहेत.(क्रमशः)चंद्रकांत झटाले, अकोला ९८२२९९२६६६