उन्मत्त माणसाला नियतीने मारलेला कोरोना जबरदस्त ” फटका “- अचऀना उके यांनी व्यक्त केले विचार.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 28 एप्रिल 2021
माणुसकी , स्वच्छता , निस्वार्थीपणा , कुटुंब व्यवस्था , पैशांचा दुरुपयोग, विलासीपणा , ऐशारामी जीवन, आता ह्या हरामाच्या पैशाचे काय करायचे ???? म्हणून विनाकारण केले जाणारे प्रवास , देवस्थानांच वाढलेलं प्रस्थ , श्रीमंती , माजमस्ती , उद्धटपणा , सत्तालोलुपता , मग्रुरी , गुंडगिरी , जगण्याचा अर्थ , मरणाची भीती , केलेल्या वाईट कृत्यांची आठवण , समारंभात केलेला पैशांचा अपव्यय, समारंभात जेवणाच्या वेळी पूर्ण पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटातील एक- दोन घास खाऊन, निर्लज्जपणे बाकीचे तसेच ठेऊन ताटावरून उठून जाण्याची वाढती प्रवृत्ती, तसेच निकृष्ठ जीवन शैली , अशा अनेक गोष्टी शिकायला पाहिजे.
पूर्वीच्या परंपरा विसरून आम्ही आधी तुळशीला घराबाहेर काढलं ! ” त्याला काय होतंय ?
” हा प्रश्न विचारणाऱ्या नवीन पिढीला हा चांगलाच झटका आहे ,
सकाळी शुचिर्भूत होणे ही संकल्पना हळू हळू लयास चालली होती . कधीतरी वाट्टेल तेव्हा अंथरुणातून उठून ” शॉवर ” खाली दोन मिनिटं उभारणाऱ्या पिढीला , आता दोन — दोन मिनिटाला हात धुवावे लागत आहेत . घरात, कापूर , उदबत्ती , देवापुढे दिवा ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धेच्या सोईस्कर नावाने फाटा दिला गेला आहे . आता त्याच कापरासाठी मॉल मध्ये लाईन लागलीय . संध्याकाळची उदबत्ती लावून म्हटलेली रामरक्षा ही वरदान ठरतेय . घरी आल्यावर आधी पायावर पाणी घेणारी आपली संस्कृती सोडून बुटासकट बेडवर झोपून , मोजे काढून भिरकवणारे आता चांगलेच पोळले आहेत. धूप, दीप, नैवेद्य, आरतीमुळे प्रसन्न होणारं घरातलं वातावरण आता कमालीचं गढूळ झालंय .
पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी तर ” घरचं जेवण ” लोक हळू हळू विसरत चालले होते. आता त्याची नितांत गरज भासतेय. उठलं की सुटलं. प्रत्येक सुट्टीला गाडी घेऊन पर्यटन हेच जीवन असं थोडं वाटायला लागलं होतं, त्यावर पण थोडा आळा बसेल.
अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्कारांची दिलेली तिलांजली आता आपल्याच बोकांडी बसलीय .
सणासुदीच्या रूपाने पूर्वजांनी केलेली रचना किती वेडगळ पणा आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारी पिढी आता त्या मार्गाचा अवलंब नक्की करेल असं वाटायला लागलय .
शेवटी निसर्गापुढे सगळे सारखेच . रस्त्यावरच्या भिकाऱ्याला किंवा स्कॉर्पियोमधून फिरणाऱ्या श्रीमंताला ” मास्क ” बांधून फिरायची वेळ आलीय .
हे मानवा……. तू कितीही पुढारलास तरी शेवटी तुझ्या जगण्याची गुरू किल्ली फक्त त्या नियंत्याकडेच आहे .
त्यामुळे त्याचं स्मरण कर . जैन मुनींनी तोंडाला फडकं बांधलेलं बघून हसणारे आज तेच करताहेत .
फक्त त्यांचा उद्देश कीटक मरू नयेत हा होता . पण आज आपला उद्देश बेवारस कुत्त्येकी मौत, रस्त्यात मरून पडलेल्या घुशी किंवा उंदरासारखं मरण नको, तर सुसंस्कृतपणाचं, तारतम्य भाव ठेवुन, विवेकशील, तत्वशील आणि सत्वशील असं जीवन असावं,हाच खरा त्यामागचा उद्देश आहे.
पुराण ,ग्रंथ ,उपनिषदे यांच्यावरची धूळ झटका तरच हा झटका पचवण्याची ताकद तुमच्यात येईल. अन्यथा वडापाव, बर्गरच्या पिढीला असे कितीतरी कोरोना दर चार वर्षांनी झेलावे लागतील त्यासाठी….सर्वांना चांगली बुद्धी दे ,आरोग्य दे , सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात जावे जगावरील संकट टाळून सर्वांना उदंड आयुष्य मिळावे. सर्वाचं भलं व्हावे. ,कल्याण व्हावे,रक्षण व्हावे.