BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

उध्दवराव, गोर-गरिबांना विषाची पुडी द्या मग लॉकडाऊन करा— दत्तकुमार खंडागळे वज्रधारी,

Summary

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि ४ मार्च २०२१ राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. त्याला त्याच्या अस्तित्वाची काळजी लागली आहे. गतवर्षी बावीस मार्चला त्याच्या मानगुटीवर लॉकडाऊनची कु-हाड पडली अन तो पुरता उध्वस्त झाला. तब्बल […]

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम
दि ४ मार्च २०२१
राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. त्याला त्याच्या अस्तित्वाची काळजी लागली आहे. गतवर्षी बावीस मार्चला त्याच्या मानगुटीवर लॉकडाऊनची कु-हाड पडली अन तो पुरता उध्वस्त झाला. तब्बल आठ-दहा महिने लॉकडाऊनचा खेळ सुरू राहिल्याने सामान्य माणूस आणि त्याचे अर्थकारण पुरते झोपले. अचानकच झटका आल्यासारखे त्याला बंदिस्त केल्याने सामान्य माणूस एकवेळच्या जेवणासाठी मोताद झाला होता. त्याचवेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र माकडचाळे करण्यात व्यस्त होते. ‘दिवे पेटवा, थाळ्या वाजवा” असल्या मुर्ख आणि खुळसट कल्पना सांगून देशाला वेड्यात काढत होते. लोकांना वाचविण्याची उपाययोजना कमी आणि मुर्खपणाचे चाळे सुरू होते. त्यावर कडी म्हणजे हा मुर्खपणा कसा योग्य आहे ते भक्ताडगँग जबरदस्तीने सांगत होती. काही भक्त मंडळी या माकडचाळ्यांचे तार्कीक महत्व सांगत होती. “एकावेळेस इतके दिवे पेटतील, त्यामुळे इतकी उर्जा निर्माण होईल मग असे होईल, तसे होईल, कोरोना नष्ट होईल !” असले बावळट युक्तीवाद केले जात होते. सरकारवालेे आणि त्यांचे समर्थक याच धंद्यात व्यस्त होते तर दुस-या बाजूला सामान्य माणसाची चुल बंद होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवे पेटवण्याचे आवाहन ज्या वेळी केले होते त्याच वेळी या देशातल्या लाखो चुली अन्न-धान्याभावी पेटलेल्या नव्हत्या. कित्येक झोपडीत लहान लहान मुले उपाशीपोटी झोपली होती. हे या देशाचे विदारक वास्तव आहे. राजकारणाची भांग प्यायलेल्या नेत्यांना आणि त्यांच्या मुर्ख समर्थकांना त्यातून शुध्द आली तरच या वास्तवाचे भान होईल. दिवे पेटवण्याने आणि थाळ्या वाजवण्याने ना कोरोना गेला ना आटोक्यात आला. पण मुर्खांच्या गर्दीला कोण समजून सांगणार ?
लॉकडाऊनच्या या कालखंडात लोकांची प्रचंड पिळवणूक झाली. देशाचे “न भुतो न भविष्यती” नुकसान झाले. लॉकडाऊनच्या तडाख्याने सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, मजूर आदी वर्ग पुरता उध्वस्त झाला आहे. या विदारक परस्थितीने खुप मोठा वर्ग आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातल्या कित्येकांनी आत्नहत्या केल्याही आहेत. एकूणच चित्र फार भयावह आहे. कोरोना रोगापेक्षा लॉकडाऊनचा रोग भयंकर निघाला. कोरोनाची बाधा झालेले ठणठणीत झाले पण लॉकडाऊनची बाधा झालेले आजतागायत दुरूस्त झालेले नाहीत. देश लॉकडाईन करता आला पण पोटातली भुक कशी लॉकडाऊन करणार ?या स्थितीला दुरूस्त करण्यासाठी सरकारकडे काही उपायोजनाही नाहीत किंवा सरकारने त्या केल्याही नाहीत. आता पुन्हा लॉकडाऊन होईल या भितीने हा सगळा वर्ग धास्तावला आहे.गत लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे लाईव्ह यायचे. “भाडे घेवू नका, कुणाला त्रास देवू नका, एकमेकांना मदत करा, आधार द्या, धीर द्या !” असे आवाहन करायचे. त्यांनी ते आत्मियतेने केलेलं आवाहन बरं वाटायचं. मनाला दिलासा देवून जायचं. एक सत्शील व संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला याचे कौतुक वाटायचं. पण नंतरच्या काळात ना कुणी भाडे कमी केले, ना कुणी आधार दिला. (काही अपवाद वगळता ) अनेक ठिकाणी पोरांनी आई-बाप घरात घेतले नाहीत, बायकोने नवरा घरात घेतला नाही. गाववाल्यांनी गावची माणसं गावात घेतली नाहीत. सगळी नाती-गोती मतलबी असल्याचे लक्षात आले. प्रारंभीच्या काळात जनावरापेक्षा वाईट वागणूक माणसं परस्परांना देत होती. “लोकांना धीर द्या !” म्हणून सांगणारे सरकारवालेही तसलेच निघाले. गत वर्षभरात लोकांच्याकडे पैसे नाहीत. धंदे बंद आहेत, अनेकांच्या हाताला काम नाही, अनेकांच्या व्यवसायांनी कायमचा श्वास सोडला आहे तर अनेकजण दिवाळखोरीत निघाले आहेत. तमासगीर, खेळणीवाले, बलुतेदार, कामगार, शेतकरी असा तळातला सारा वर्ग अक्षरश: बरबाद झाला आहे. ज्यांचे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी लोकांना परस्परांना आधार देण्याचे, मदत करण्याचे आवाहन करत होते पण ज्या वेळी त्यांच्या सरकारने आधार देण्याची वेळ आली तेव्हा ते ही बदलले. लॉकडाऊनच्या काळातले वीज बील माफ करण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. तेवढीही दानत त्यांच्या सरकारात दिसली नाही. पुर्ण बील राहिले किमान स्थिर आकार तरी माफ करता आला असता पण ते ही नाही झाले. फुकटच्या तोंडाने फेसबुकवर आवाहन करणे आणि संवेदनशिलतेने लोकभावना समजून घेणे यात फरक असतो. उठता-बसता छत्रपती शिवरायांचे नाव घेणा-या उध्दवजींनी ती समजून घ्यावी. दुष्काळात शेतक-यांना बि-बियाणे मोफत देणारा, रयतेला धान्य वाटणारा छत्रपती शिवाजी राजा समजून घ्यावा. वीजबीलं भरली नाहीत म्हणून लोकांची कनेक्शन तोडायला ठाकरे सरकारने सुरूवात केली आहे. बँकेची वसुली पथकं दारात यायला सुरूवात झाली आहे. ना गाळा भाडे कुणी माफ केले, ना घर भाडे कुणी माफ केले, ना बँकांची व्याजे कुणी माफ केली. महावितरणवाले तर “सोनू तुला माझ्यावर भरोसा न्हाय का ?” असली गीतं लावत वसूली करत आहेत. ही सगळी सामान्य माणसांची क्रुर चेष्टा आहे, त्याची पिळवणूक आहे. जर लॉकडाऊन करायचेच असेल तर उध्दवरावांच्या सरकारने लोकांना विषाची पुडी द्यावी. सामान्य माणूस, गोरगरीब माणूस ते विष खाऊन सुखाने मरेल. कोरोना झाला तरी आणि नाही झाला तरी त्याचे मरण अटळच आहे. त्याची पिळवणूक, छळवणूक अटळच आहे. त्यापेक्षा सरकारने सामान्य लोकांच्यावर दया करावी. त्यांना सहज मरता यावे यासाठी विषाच्या पुड्या घरोघर वाटाव्यात अन मगच लॉकडाऊन करावे. मरण्यासाठी विष विकत घेण्याचीही औकाद या सामान्य माणसांची राहिलेली नाही याचे भान सरकारला येईल का ?
एका बाजूला सामान्य माणूस लॉकडाऊनच्या भितीने धास्तावला आहे तर दुस-या बाजूला राज्यात राज्यकर्त्यांचे तमाशे सुरू आहेत. रोज नवनवे वगनाट्य सुरू आहे. विरोधातले लोक सत्तेत येण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत तर सत्तेतले लोक सत्ता वाचविण्यासाठी आटापिटा करत आहेत. फडणवीस आणि टोळीला सत्तेत यायचे आहे तर आघाडीच्या टोळीला बुडाखालील सत्ता वाचवायची आहे. दोन्हीकडचे राज्यकर्ते नादान असल्याचे जाणवते आहे. परस्थितीने पिचलेला माणूस आणि महाराष्ट्र वाचविण्याऐवजी सत्ता वाचविण्याचे आणि सत्तेत येण्याचे प्रयत्न जिवाच्या आकांताने सुरू आहेत. केवळ परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक चालू आहे. राज्य आणि जनता इतक्या अडचणीत असताना राज्यकर्ते असे वागतात हे दु:खद आहे. राज्याच्या इतिहासात आता इतका थिल्लर आणि उतावळा विरोधीपक्ष कधीच नव्हता. बाळासाहेब ठाकरे, गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन ही नेते मंडळी त्यांच्या आयुष्यातला सत्तर-ऐंशी टक्के काळ विरोधातच होती पण ते देवेंद्र फडणवीसांसारखे बेजबाबदार, थिल्लर आणि उतावळे झाल्याचे कधीच दिसले नाहीत. सत्तेत येण्यासाठी फडफड करताना दिसले नाहीत. सत्तेत येण्यासाठी कुठल्याही थराला जाताना दिसले नाहीत. विरोधात राजकारण करतानाही त्यांनी संवेदनशिलता व नैतिकता जोपासली. व्यापक व जनहिताचे राजकारण केले. अडचणीच्या काळात सत्तेतल्या लोकांना साथ दिली. त्यांची पाठराखण केली. राजकीय मतभेद, पक्षीय मतभेद वेळोवेळी बाजूला ठेवून महाराष्ट्र म्हणून आम्ही एकच आहोत हे त्यांनी दाखवून दिले. चेले-चपाटे गोळा करून त्यांनी फडतूस आक्रस्ताळेपणा कधीच केला नाही. देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाला मात्र याचे कसेलही भान राहिलेले दिसत नाही. त्यांनी विरोधी पक्ष आणि त्यांची उंचीच खुजी करून टाकली आहे. प्राथमिक शाळेतली मुलं जशी भांडतात तसले बावळट भांडण आणि स्वार्थी सत्तेचे खेळ मांडले आहेत. वेळ कुठली आहे, आपण काय करतो आहोत ? याचे भान या माणसाला बिलकुल राहिलेले दिसत नाही. सत्ता गेल्याने पुर्ण पिसाळलेला विरोधी पक्षनेता आणि विरोधी पक्ष या पुर्वी कधीच महाराष्ट्राने पाहिला नव्हता. फडणवीसांनी सत्तेने कासाविस होवून केलेल्या थिल्लर फडफडीची इतिहासात नोंद होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *