*राज्यातील ‘हा’ जिल्हा प्रत्येक शनिवार, रविवार राहणार पूर्ण बंद*
मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस सध्या राज्यातील कोराना रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अशातच कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेत औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई, पुणे या शहरांपाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.
अंशत: लॉकडाऊन असलं तरी जर या काळात रूग्णांची संख्या वाढत गेली आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असं वाटल्यास संपुर्ण लॉकडाऊन करणार असल्याचंही सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. या काळात खासगी आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना 15 दिवसाला कोरोनाची चाचणी बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच चाचणीचं प्रमाणपत्र आपल्यासोबत ठेवायलाही सांगितलं आहे.
दरम्यान, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलतरण तलाव, शाळा-महाविद्यालयं आणि विवाह समारंभांना परवानगी असणार नाही. तर शनिवारी आणि रविवारी केवळ वैद्यकीय सेवा, माध्यम कार्यालय, दूध विक्री, भाजीपाला, फळविक्री सुरू राहणार असल्याचं सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे.
प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991