महाराष्ट्र

कचरा संकलन कंत्राटात भ्रष्टाचार आरोपांची चौकशी होणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Summary

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेचे कचरा संकलन कंत्राट वादग्रत ठरले आहे. स्वयंभू नामक कंपनीला आधीचे कंत्राट रद्द करून जास्त दरात हे कंत्राट मंजूर करण्यात आले. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेचे कचरा संकलन कंत्राट वादग्रत ठरले आहे. स्वयंभू नामक कंपनीला आधीचे कंत्राट रद्द करून जास्त दरात हे कंत्राट मंजूर करण्यात आले. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

वरोरा येथे शिवसेनेच्या मेळाव्याला ते आले असता त्यांनी यावर भाष्य केलं. ‘चंद्रपूर मनपाच्या कचरा संकलन कंत्राटाची तक्रार प्राप्त झाली आहे, त्या दृष्टीने नगरविकास खात्याच्या माध्यमातून पाहणी सुरू आहे. जर या कचरा संकलन कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले तर नक्कीच यावर कारवाई करणार’, अशी स्पष्टोक्ती यावेळी शिंदे यांनी दिली.

पूर्वीच्या कंपनीचा कंत्राट कालावधी पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कचरा संकलनाच्या संबंधात निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये 6 पैकी दोन कंपन्या तांत्रिक दृष्टीने बाद झाल्याने चार कंपन्या पात्र ठरल्या. यामध्ये पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीने सर्वात कमी म्हणजे 1700 रुपये प्रति टन कचरा यानुसार किंमत लावली. कंपनीने सर्व आर्थिक गणित जुळवूनच ह्या कंत्राटाची निविदा भरली.

मात्र इतक्या कमी किमतीत हे काम होऊ शकत नाही हे कंपनीच्या आधी स्थायी समितीला कळलं. त्यामुळे समितीनेच ही निविदा रद्द केली. यानंतर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात नव्याने निविदा मागविण्यात आल्या. यात स्वयंभू कंपनीला 2500 रुपये प्रतिटन याप्रमाणे कचरा संकलनाचे कंत्राट देण्याला मंजुरी देण्यात आली. कचरा संकलनाची अद्यावत सुविधा आणि कामगार कायद्यानुसार कामगारांचे वेतन ह्या बाबी समोर ठेऊनच निविदा मागविण्यात आल्या.

मग ह्याचे आर्थिक गणित जमवूनच स्वयंभू कंपनीने 1700 रुपये प्रतिटन याप्रमाणे निविदा भरली असं म्हणायला वाव आहे. तसेच निविदा प्राप्त झाल्यावर निविदा सादर करणाऱ्या कंपन्यांसोबत बैठक घेतली जाते ज्याला ‘प्रीबीड मिटिंग’ असे म्हणतात. या बैठकीत आयुक्त आणि संबंधित विभागाचे प्रमुख असतात. यावेळी कंत्राट संबंधी अनेक तांत्रिक बाबींवर चर्चा होते. याही वेळी ही बाब कंपनीच्या लक्षात आली नाही का, हा देखील प्रश्न आहे.

स्वयंभू कंपनीने हा प्रताप केल्यावर पून्हा निविदा मागविण्यात आल्या. पैसे देऊन याची जाहिरातबाजी करावी लागली. यात दोन महिन्यांचा वेळ वाया गेला. मागच्या कंपनीला दोन महिन्याचे कंत्राट वाढवून देण्यात आले, त्यात मनपाच्या पैशाचा नाहक अपव्यय झाला. अशावेळी कंपनीला वगळता आले असते. मात्र, याच स्वयंभू कंपनीला पून्हा संधी देण्यात आली. आणि यावेळी 2500 प्रमाणे त्यांना काम देण्यात आले. त्यामुळेच या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात आला. स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी याबाबतची तक्रार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्याची मागणी त्यात केली होती. एकनाथ शिंदे यापूर्वी चंद्रपूरात आले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी ते वरोरा येथे शिवसेनेच्या मेळाव्याला आले असता त्यांनी यावर पुन्हा एकदा भाष्य केले. या संदर्भात चाचपणी सुरू आहे. जर यात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले तर कारवाई होणार, यात कुणालाही सोडलं जाणार नाही असे ते म्हणाले. त्यामुळे ह्या कचरा संकलनाचे कंत्राट भविष्यात चांगलेच गाजणार आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *