राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या घंटानाद आंदोलनाची दखल. पोलिस भरतीचा मार्ग खुला, शासन निर्णय निघाला
राज्यात मागील तीन वर्षापासून प्रलंबित असलेली 12 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, आमदार विकास ठाकरे , आमदार एडवोकेट अभिजित वंजारी व इतर पदाधिकारी यांचे नेतृत्वात व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, 11 जानेवारी 2021 रोज सोमवारला गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने 12 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्यापैकी 5500 जागांची पदभरती येत्या आठ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. आणि यासंदर्भात नुकताच 13 जानेवारी 2021
रोजी गृहमंत्रालयाचा शासन निर्णय निर्गमित झाला असून या निर्णयामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मुळे मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानुसार पोलीस भरती 2019 या प्रक्रियेबाबत निर्गमित करण्यात आलेला 4 जानेवारी 2021 चा जीआर अधिक्रमित करून पुढील आदेश देण्यात आले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 9/9/ 2020 रोजी सिव्हील अपील क्रमांक 3123/ 2020 व इतर याचिका यामध्ये दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन 2019 या वर्षातील पोलीस संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग(SEBC) करिता ठेवण्यात आलेली रिक्त पदे खुल्या प्रर्गात वर्ग करण्यात यावीत.
- सामाजिक व शैक्षणिक मागास ( SEBC)प्रवर्गातील, पोलीस भरती 2019 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सामान्य प्रशासन विभागाच्या 23/ 12/ 2020 च्या शासन निर्णयानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे( EWS)
चे प्रमाणपत्र प्राप्त करून त्यांच्या इच्छेनुसार या भरतीसाठी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चा लाभ घेऊन या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटका साठीचा (EWS ) चा लाभ घेऊ न इच्छिणाऱ्या मात्र खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून लाभ घेऊन भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल.असे आदेश देण्यात आलेले आहेत. या निर्णयामुळे आता पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. प्रा. शेषराव येलेकर
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी