कारधा परिसरात रेती माफियांवर मोठी कारवाई; विना परवाना उत्खनन व वाहतुकीत गुंतलेल्या टोळ्यांचा पर्दाफाश
भंडारा | प्रतिनिधी
कारधा पोलीस ठाणे हद्दीत अवैध रेती उत्खनन आणि चोरट्या वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत रेती माफियांना जोरदार दणका दिला आहे. 15 जानेवारी 2026 रोजी करजखेडा–उसरागोंदी मार्गावरील डोंगरदेव पहाडी परिसरात झालेल्या कारवाईत एकूण चार वेगवेगळ्या ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आल्या असून सुमारे 18 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात, पोलीस स्टॉपच्या पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद हालचाली आढळून आल्याने तीन ट्रॅक्टर-ट्रॉली रोखण्यात आल्या. माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी विकास प्रभाकर घोलप घटनास्थळी दाखल झाले. तपासात राजेंद्र दशरथ मेश्राम, प्रदीप रमेश समरीत आणि राकेश राजू गायधने (सर्व रा. खमारी बु.) हे संगनमताने विना पास परवाना रेती उत्खनन व वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. या तिघांकडून सुमारे 18,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
दुसऱ्या प्रकरणात, याच मार्गावर एका स्वतंत्र कारवाईत मुन्ना रामचंद्र मांडरे (ट्रॅक्टर चालक) आणि निखिल चिंतामन मारवाडे (ट्रॅक्टर मालक) यांना विना परवाना रेती वाहतूक करताना पकडण्यात आले. रेतीने भरलेली ट्रॉलीसह ट्रॅक्टर डिटेन करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या दोन्ही प्रकरणांत आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या नियमांना हरताळ फासून निसर्गसंपत्तीची लूट केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पो.हवा. संदीप केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, कारधा पोलिसांनी रेती माफियांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतली असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
सदर कारवाईमुळे अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरत आहे.
संकलन : अमर वासनिक,
न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
