गोबरवाही परिसरात रेतीमाफियांवर पोलिसांचा जोरदार प्रहार पहाटे व रात्रीच्या कारवाईत तीन वाहने जप्त; ₹1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत
तुमसर / गोबरवाही :
भंडारा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी कंबर कसत गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत मोठी धडक कारवाई केली आहे. एकाच दिवशी पहाटे व रात्री करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांत तीन अवजड वाहने, 14 ब्रास रेतीसह सुमारे ₹1 कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, रेतीमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
🚨 पहाटेची कारवाई : दोन ट्रक पकडले
दि. 13 जानेवारी 2026 रोजी पहाटे 04.30 ते 05.30 दरम्यान गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मंगेश चंबरू पेंदाम हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करीत असताना बावनथडी–खापा–रोंघा–लेंडेजरी मार्गावर संशयास्पद हालचाल दिसून आली.
बावनथडीकडून येणारे
पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड ट्रक (MH 34 ** 5567)
निळ्या रंगाचा अशोक लेलँड ट्रक (MH 40 ** 0615)
या दोन्ही ट्रकना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्या मागील डोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेती आढळून आली. रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना चालक–मालकांकडे नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रत्येकी ₹40 लाख किमतीचे दोन ट्रक व 12 ब्रास रेती (₹60,000) असा एकूण ₹80,60,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🌙 रात्रीची कारवाई : टिपर जप्त
याच दिवशी रात्री 20.30 ते 21.30 दरम्यान गोबरवाही पोलिसांनी चांदमारा–डोंगरी बु. रोडवर आणखी एक कारवाई केली.
डोंगरी बु.कडून येणाऱ्या
टिपर क्रमांक MH 40 BJ 9564
या वाहनाची तपासणी केली असता, त्यात 2 ब्रास अवैध रेती (₹12,000) आढळून आली. वाहतूक परवाना नसल्याने ₹20 लाख किमतीचा टिपर व रेती मिळून एकूण ₹20,12,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
⚖️ गुन्हे दाखल; तपास सुरू
या दोन्ही प्रकरणांत संबंधित वाहन चालक व मालकांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 49 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणाचा तपास पोउपनि. निवृत्ती गिते, तर दुसऱ्या प्रकरणाचा तपास पो.हवा. मंगेश पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
🔥 रेतीमाफियांना कडक इशारा
गोबरवाही पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेती चोरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला असून, पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
