मैत्रेय बुद्ध विहारातील बॅनरवरून वाद; सदस्य नोंदणीबाबत प्रश्नचिन्ह कार्यकर्त्यांकडून पारदर्शकतेची मागणी, समाजात संभ्रमाचे वातावरण
चंद्रपूर :
राजीव गांधी नगर, चंद्रपूर येथील मैत्रेय बुद्ध बहुउद्देशीय युवक पुरुष मंडळ व मैत्रेय बुद्ध विहार संदर्भात अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका बॅनरमुळे समाजात चर्चा व संभ्रम निर्माण झाला आहे. बॅनरवर काही व्यक्तींची नावे व फोटो झळकावण्यात आले असून, त्या व्यक्तींची सदस्य नोंदणी नेमकी कधी व कशा पद्धतीने झाली, याची माहिती आपल्याला नसल्याचा सवाल एका सक्रिय कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे.
संबंधित कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार, मैत्रेय बुद्ध विहाराशी थेट संबंध नसलेल्या काही व्यक्तींची नावे व फोटो बॅनरवर दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, नवीन कार्यकर्ते संघटनेत सहभागी होत असतील तर त्याचे स्वागतच आहे, मात्र त्यासाठी योग्य प्रक्रिया, पारदर्शकता आणि सर्वांची माहिती असणे आवश्यक आहे.
कार्यकर्त्याने आपल्या भूमिकेत असेही नमूद केले की, समाजातील काही लोक वेळ देऊन काम करत असतानाही त्यांना डावलले जाते, तर ज्यांचा विहाराच्या कार्याशी फारसा संबंध नाही, त्यांना संधी दिली जाते. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. काहींना वेगवेगळी कारणे देऊन दूर ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आपल्या भावनिक निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा उद्देश कोणावर टीका करणे किंवा वाद निर्माण करणे हा नसून, मैत्रेय बुद्ध विहाराचे बांधकाम, समाजाची प्रगती आणि प्रत्येक कुटुंबाची उन्नती हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. समाजातील अंतर्गत मतभेदांचा फायदा बाहेरील शक्तींनी घेऊ नये, अशीही त्यांनी भूमिका मांडली.
यासोबतच, नव्याने स्थापन झालेल्या कमिटीने जुन्या कमिटीकडून आर्थिक व प्रशासकीय हिशोब घेऊनच पुढील कामकाज सुरू करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. आपले बोलणे किंवा संदेशामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली असून, गरज पडल्यास पद काढण्यासही ते तयार असल्याचे सांगितले. मात्र समाजासाठीचे कार्य शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या संपूर्ण प्रकरणामुळे मैत्रेय बुद्ध विहार व संबंधित संघटनांमध्ये पारदर्शकता, संवाद आणि एकोप्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता या मुद्द्यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका काय राहते आणि समाजातील संभ्रम दूर करण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय भीम, जय संविधान
— असा एकतेचा संदेश देत कार्यकर्त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक तथा डायरेक्टर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
