महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुज्जीवन, संवर्धन आवश्यक याबाबत धोरण निश्चितीची मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील यांची माहिती

Summary

मुंबई, दि. २३ : स्वच्छ व शाश्वत बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झरे हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. विविध नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणांमुळे बरेच झरे आटत चालले आहेत. आपली पाण्याची गरज मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झऱ्यांचे पुनर्भरण व […]

मुंबई, दि. २३ : स्वच्छ व शाश्वत बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झरे हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. विविध नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणांमुळे बरेच झरे आटत चालले आहेत. आपली पाण्याची गरज मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झऱ्यांचे पुनर्भरण व संवर्धन आवश्यक असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा मृद व जलसंधारण विभाग लवकरच धोरण निश्चित करणार आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील यांनी दिली.

वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा व ग्रामपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी येथे आयोजित झऱ्यांचे व्यवस्थापन या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

झऱ्यांचे पुनरुज्जीवन व संवर्धन यासाठी जाणीवपूर्वक काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे या नवीन विषयात झोकून देऊन काम करा, या विषयातील जाणकार बना आणि पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

यावेळी ॲक्वाडॅमचे संचालक डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील झऱ्यांच्या पुनरुज्जीवनाचे धोरण याबाबत मार्गदर्शन केले. झरा हा भूजलाचा सर्वात पुरातन स्त्रोत असून, पाण्याचा हा स्त्रोत पर्यावरणपूरक असल्यामुळे त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी, शासन, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, नाबार्ड आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

झरे हे स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. त्यामुळे त्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणे गरजेचे असून शासन, प्रशासनाबरोबर जनतेचीही ती सामूहिक जबाबदारी असल्याचे मत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी व्यक्त केले.

प्रशिक्षणार्थींना झऱ्याचा संपूर्ण प्रवास समजावा यासाठी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील रानगेघर या गावातील तामकडा या झऱ्याचा ट्रान्झिट वॉक करण्यात आला. यामध्ये झऱ्याच्या पाण्याच्या उगम बिंदूपासून ते खाली वाहणाऱ्या प्रवाहापर्यंतचा नैसर्गिक प्रवास, पाणी जमिनीत मुरण्याची ठिकाणं, पाण्याचा प्रवाह, मार्ग, झऱ्याची सध्यस्थिती, आजूबाजूची भूगर्भीय व भौगोलिक माहिती, पाण्याची गुणवत्ता, स्प्रिंग बॉक्स, पाणलोट विकासाची कामे, मानवी हस्तक्षेप या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्यात आला. यामध्ये ग्रामस्थांसोबत ॲक्वाडॅमचे मुकेश पाटील, मृत्युंजय विचारे, ग्रामपरीचे दिपक जाधव, विकास जाधव यांनी तांत्रिक माहितीसह मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाची सुरुवात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, ग्रामपरीच्या संचालक जयश्री राव व अर्चना राव यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आले. एक्वाडॅमच्या भूवैज्ञानिकांनी महाराष्ट्रातील नैसर्गिक झऱ्यांची ओळख, नोंदणी, संरक्षण, पुनरुज्जीवन, पाण्याची सातत्यपूर्ण उपलब्धता तसेच लोकसहभागातून शाश्वत व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

झऱ्यांचे व्यवस्थापन या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 50 मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये झऱ्यांचे धोरण राबविताना हे ट्रेनर्स दिशादर्शक म्हणून काम करतील.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *