भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

मजूर सुरक्षेत गंभीर चूक, कंत्राटदाराची निष्काळजीपणा उघड निर्माणाधीन इमारतीतून पडून मजूर गंभीर, प्रकृती नाजूक

Summary

तुमसर | प्रतिनिधी — तुमसर शहरातील तुमसर पोलीस स्टेशन परिसरात पोलीस विभागासाठी उभारण्यात येत असलेल्या कॉरिडॉरच्या निर्माणाधीन कामादरम्यान मजूर सुरक्षेबाबत गंभीर हलगर्जीपणा समोर आला आहे. काम सुरू असताना चौथ्या मजल्यावरून पडल्याने एका तरुण मजुराला गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती […]

तुमसर | प्रतिनिधी — तुमसर शहरातील तुमसर पोलीस स्टेशन परिसरात पोलीस विभागासाठी उभारण्यात येत असलेल्या कॉरिडॉरच्या निर्माणाधीन कामादरम्यान मजूर सुरक्षेबाबत गंभीर हलगर्जीपणा समोर आला आहे. काम सुरू असताना चौथ्या मजल्यावरून पडल्याने एका तरुण मजुराला गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती सध्या नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
जखमी मजुराचे नाव हेंमत मेश्राम (वय 21 वर्षे) असून तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो तुमसर येथे वास्तव्यास होता. ही घटना दि. 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास घडली. निर्माणाधीन इमारतीत काम करत असताना अचानक तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला.
अपघातानंतर सहकाऱ्यांनी जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध होती का, मजुरांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट व अन्य संरक्षक उपकरणे देण्यात आली होती का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मजूर सुरक्षेसाठी शासनाने ठरवून दिलेले नियम आणि तरतुदी असतानाही संबंधित कंत्राटदाराने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच जखमी मजुराच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराने घ्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर मजुरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, जर सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष सुरूच राहिले तर काम बंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. गरीब व कष्टकरी मजुरांच्या जीवाशी खेळ न करता, त्यांना योग्य सुरक्षा साधने पुरवून सुरक्षित वातावरणात काम करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी नागरिक व कामगार संघटनांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *