बनावट लायसन्सचा काळा कारभार उघड शासकीय सिस्टीम हॅक करणारा मुख्य सूत्रधार बिहारमधून अटकेत
Summary
ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यातून नागरिकांना बनावट शिकाऊ वाहन चालक परवाने देणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करून बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून आर्थिक लूट करणाऱ्या या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जालना […]
ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यातून नागरिकांना बनावट शिकाऊ वाहन चालक परवाने देणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करून बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून आर्थिक लूट करणाऱ्या या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ही मोठी कामगिरी पार पडली. बनावट लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता.
दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी जालना येथील सहायक मोटार वाहन निरीक्षक तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अभिजीत कडुबा बावस्कर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानंतर सायबर पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा दाखल करून तपासाला वेग देण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून पटना, सिमरी बख्तियारपूर आणि सहरसा परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत बिड्डराज प्रमोद यादव (वय 24, रा. टेंगराहा, जि. सहरसा, बिहार) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला लॅपटॉप, आयफोन, थंब मशीन असा सुमारे 1 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दि. 28 डिसेंबर 2025 रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणात यापूर्वी जम्मू-काश्मीर येथील फैसल बशीर मीर आणि जालना येथील मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली होती. संपूर्ण टोळीचा छडा लावण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जालना, अपर पोलीस अधीक्षक तसेच सहरसा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली असल्याची माहिती परिवहन आयुक्त, मुंबई यांनी दिली आहे.
ऑनलाईन फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या रॅकेटविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
