आंबेडकर वॉर्ड–वरठीत चोरांचा धुमाकूळ; अमर कॉम्प्युटर सेंटर फोडण्याचा प्रयत्न फसला. रात्री गांजा ओढत शेकोटी पेटवून थांबले अज्ञात इसम पोलीस संरक्षणाचा आरोप; नागरिकांत भीतीचे वातावरण
Summary
वरठी | प्रतिनिधी आंबेडकर वॉर्ड, एकलारी रोड, वरठी येथे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात उघडपणे धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस योद्धा न्यूज नेटवर्कचे कार्यालय असलेल्या अमर कॉम्प्युटर सेंटरसमोर अज्ञात इसम गांजा ओढत शेकोटी पेटवून बसल्याचे चित्र प्रत्यक्षदर्शींनी पाहिले […]
वरठी | प्रतिनिधी
आंबेडकर वॉर्ड, एकलारी रोड, वरठी येथे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात उघडपणे धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस योद्धा न्यूज नेटवर्कचे कार्यालय असलेल्या अमर कॉम्प्युटर सेंटरसमोर अज्ञात इसम गांजा ओढत शेकोटी पेटवून बसल्याचे चित्र प्रत्यक्षदर्शींनी पाहिले असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा चोरट्यांनी अमर कॉम्प्युटर सेंटरचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलूप तोडताना झालेल्या आवाजामुळे शेजारील नागरिक जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहताच संशयित इसमांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळी राख, शेकोटीचे अवशेष आणि संशयास्पद हालचालींचे स्पष्ट पुरावे आढळून आले असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर प्रकाराबाबत पोलीस योद्धा न्यूज नेटवर्कचे न्यूज एडिटर अमर वासनिक यांनी थेट आरोप करत म्हटले आहे की, वरठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश गिरी गोसावी यांचा अज्ञात चोरांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा संशय आहे. त्यांच्या मते, परिसरात वारंवार अशा घटना घडत असताना ठोस कारवाई न होणे ही बाब अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत वरठी पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ती मिळू शकली नाही. मात्र नागरिकांनी तातडीने गस्त वाढवावी, सीसीटीव्ही बसवावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
आंबेडकर वॉर्डसारख्या वस्तीच्या भागात रात्री उघडपणे शेकोटी पेटवून, अंमली पदार्थांचे सेवन करत चोरीचा प्रयत्न होणे ही बाब कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना अटक करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
