कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईत ‘समाजाचा वाटा’
Summary
कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईत सामाजिक बांधिलकी राखत समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एचडीएफसी, बंधन बॅंक, ॲक्सिस बॅंक या बँकांनी आपल्या (सामाजिक उत्तरदायित्व निधी) ‘सीएसआर’ निधी मोठ्या प्रमाणात ‘कोविड-१९’विरुद्धच्या लढ्यासाठी उपलब्ध […]
कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईत सामाजिक बांधिलकी राखत समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एचडीएफसी, बंधन बॅंक, ॲक्सिस बॅंक या बँकांनी आपल्या (सामाजिक उत्तरदायित्व निधी) ‘सीएसआर’ निधी मोठ्या प्रमाणात ‘कोविड-१९’विरुद्धच्या लढ्यासाठी उपलब्ध करुन दिला. या निधीच्या माध्यमातून ‘कोविड-१९’ लढ्यासाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे आणि आवश्यक सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘ॲक्सिस बँके’च्या माध्यमातून ‘कोविड आणि स्वच्छ भारत’ अभियानासाठी उभारण्यात आलेल्या टेक्नोपर्पल नियंत्रण प्रणालीचे ई-उद्घाटन, ‘बंधन बँके’च्या माध्यमातून दळवी रुग्णालयात लावण्यात आलेल्या ९८ पॉईन्ट असलेल्या जम्बो ऑक्सिजन यंत्रणा तसेच ससून रुग्णालयात लावण्यात आलेल्या ड्युरा सिलेंडरच्या वाफेच्या यंत्रणेचे ई-उद्घाटन, ‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून कै.मुरलीधर पांडुरग लायगुडे रुग्णालयाला पुरविण्यात आलेल्या दोन ऑक्सिजन जनरेटरचेही ई-उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर ‘बंधन बँके’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सामुग्रीसह ‘कोविड’ जनजागृतीची यंत्रणा असलेल्या दूरदर्शन संचाचेही लोकार्पण करण्यात आले.
‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या एचएएल मशीन, संगणक संच, पोर्टेबल एक्स-रे मशीन, इसिजी मशिन, पुणे शहरासाठीचे दोन मोबाईल क्लिनीक, कार्डीयाक रुग्णवाहिका, शववाहिका, निगेटिव्ह आयर्न जनरेटरचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘कोविड’च्या काळात करण्यात आलेल्या विविध कामांसंबंधिची लघुचित्रफित दाखविण्यात आली. यापूर्वीही एचडीएफसी, बंधन बँक, ॲक्सिस बँकांसह इतर संस्थांनी ‘कोविड-१९’च्या लढ्यासाठी मोठी मदत केली आहे.
कौन्सिल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास आ. चेतन तुपे, आ. अण्णासाहेब बनसोडे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, बंधन बॅंकेचे प्रादेशिक प्रमुख सत्यजित मोहिते, एचडीएफसी बॅंकेच्या राज्य प्रमुख स्वाती शाळीग्राम, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला यांनी केले.
कोरोना महामारीच्या जागतिक संकटाची गडद सावली अर्थातच पुण्यावर सुद्धा पडली. कोणतीही लस, औषध नसणाऱ्या या संकटाचा सामना करताना सुरुवातीला इतरांप्रमाणे पुणेकर देखील भांबावले. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न डगमगता या संकटाचा मुकाबला केला. लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीवर आधीच भार होता. हा भार कमी करण्यासाठी खासगी उद्योजकांचे साह्य घेण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी सीएसआर टीम उभारली. त्यात या विषयातील तज्ञांचा समावेश केला. उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक साह्य मिळविण्यासाठी या टिमने उद्योजकांना साकडे घातले. त्याला प्रतिसाद देऊन एचडीएफसी बँक, बंधन बँक, ॲक्सिस बँक इ. उद्योगांनी सीएसआरद्वारे अर्थसाह्य केले.
त्याचवेळी असंख्य गोष्टींची, वैद्यकीय यंत्रसामुग्रीची सुविधांची मागणी निर्माण होत होती. त्याचे काटेकोर नियोजन, व्यवस्थापन, लागणाऱ्या सोयी सुविधा व अनेक आवश्यक इतर गोष्टींसाठी साधनांची जुळवाजुळव, सामुग्री पुरविणाऱ्या उद्योजक कंपन्या आणि प्रशासनाशी समन्वय, संशोधन आणि नवकल्पना यांचा अवलंब करुन मार्ग काढणे अशी अनेक कामे सीएसआर टिम करत होती. पुरवठादार व कंपन्या यांच्याशी चर्चा करून वस्तू ट्रान्सपोर्ट आणि इंस्टॉलेशन सहित पुरविण्याचे काम या पथकाने केले.
ऑनसाईट ऑक्सिजन जनरेशन प्लांट – ऑक्सिजन निर्मितीचा प्लांटच जर रुग्णालयाच्या आवारात असेल तर रुग्णालय व्यवस्थापनाला ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी धावपळ करण्याची गरज उरणार नाही, अशी कल्पना सीएसआर टीमने पुढे आणली. उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी टीमला यावर काम करण्यास सांगितले आणि टीमनेही तातडीने रिसर्च करून पीएमसी हॉस्पिटल, धायरी, कै. मुरलीधर पांडुरग लायगुडे डिस्पेंसरी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स एचडीएफसी बँकेच्या सीएसआर फंडाच्या मदतीतून उभारले.
या प्लांटमध्ये वातावरणातील हवा खेचून शुद्ध ऑक्सिजन वेगळा केला जातो. त्यानंतर ऑक्सिजन कॉम्प्रेस्स स्वरुपात टॅंकमध्ये साठवला जातो. अखंडित वीज पुरवठा असल्यास ऑक्सीजन संपण्याचा विषय येत नाही. हा प्लांट उभारण्याकरिता कोणत्याही ॲथोरिटीकडून परवानगी घेण्याची गरज नसते व तुलनेने अत्यंत कमी जागा लागते. हे ऑनसाईट ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स कार्यान्वित झाल्यामुळे हॉस्पिटल्सना ऑक्सिजनकरिता पुरवठा साखळीवर अवलंबून राहावे लागणार नाही. पुणे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये, यासाठी उचललेले हे मोठे पाऊल आहे. अशाच प्रकारे सीसीसी सेंटरमध्ये छोटे पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सट्रेटर जे पाच लीटर प्रती मिनिट ऑक्सिजन देतात ते ही बंधन बँक आणि एचडीएफसी बँक च्या सीएसआर मार्फत मिळवून बसविण्यात आले.
रुग्णालय व्यवस्थापन
कोरोना समस्या नेहमीसारखी हाताळून चालणार नव्हती. त्यामुळे कोरोनाकरिता वेगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनाची गरज होती. त्यावर अभ्यास करून टीमने पुण्याच्या ससून रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसओपी (स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर्स), प्रोसेस, मॅन्यूअल, चेकलिस्ट इत्यादी व्यवस्थापन प्रणाली तयार केल्या.
रूग्णालये, व दवाखाने यांकरिता : इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स आणि दवाखाने यांना अनेक यंत्रसामुग्री, वस्तू, सेवा आणि सुविधा लागणार होत्या. त्याचे काटेकोर नियोजन करून, त्या उपलब्ध करून, वितरण करण्याचे काम सीएसआर टिमने केले. यामध्ये सॅनेटाईजर (85 हजार लीटर), फाय सीबीसी ॲनलायजर (1), बेडसाईड लॉकर (20), संगणक, प्रिंटर, स्कॅनर, इ. (15), वॉचेस (1), अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक्स रे मशीन्स (5), एलिसा रीडर वॉशर (1), क्रिटीकल कोरोना रुग्णांकरिता आवश्यक प्रणाली (02), हाय एंड बीआय पीएपी मशीन्स (13), इंटयूबेशन बॉक्स (650), आयआयटी मानांकीत निगेटिव्ह आयऑन जनरेटर ( 371), 5-एलएमपी इन्बिल्ट नेब्युलायजर सह ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर्स (5), आधुनिक पोर्टेबल ईसीजी मशीन्स – (33), पोर्टेबल एक्स रे मशीन्स वीथ स्टँड (35), लार्ज आऊटर डिसप्ले सह प्रमाणित पल्स ऑक्सीमीटर – (879), रीसायकलिंग मेडिकल बेड्स वीथ मॅट्रेस – (10), एक्सरे मशीन करिता सेट ऑफ कॅसेट्स- (35), सोडियम हायपो क्लोराईड सोल्युशन (21 हजार), बॅटरीवर चालणारे स्प्रे पंप – (1,126), प्रमाणित थर्मल इन्फ्रारेड थर्मामीटर – (294), स्वॅब स्पेसीमनची वाहतूक – (300), ट्रू एनएटी कोविड 19 कार्टेजेज – (300), यूनिवर्सल कार्टेज सेंपल पर किट – (300), यूनिवर्सल प्री ट्रीटमेंट पॅक – (300), अत्याधुनिक शववाहिका (1) यांचा समावेश आहे.
डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांची व्यवस्था
डॉक्टरांना कोरोना रुग्णांची तपासणी व सर्जरी करतांना त्यांच्या सुरक्षेकरिता लागणारे पीपीई किट्स, एन 95 मास्क, गॉगल्स, फेस शिल्ड, आयएसओ मानांकीत 280 एमएम नायट्राइल ग्लोव्ज यांचे वितरण केले. (सर्व मिळून संख्या – 13,220) डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था केली.
ऑक्सीजन समस्या आणि उपाय
कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. सीएसआर टिमने प्रथम ऑक्सीजनची सोय असलेल्या रुग्णालयांत ऑक्सीजन पुरावठा यंत्रणा अपडेट आणि सक्षम करण्यावर भर दिला. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेचे सोपे सुटसुटीत उदा. जंबो आणि ड्युरा सिलिंडरसारखे पर्याय शोधले. शिवाय सीएसआर टिमने दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील उभारले.
ऑक्सीजन संबंधी उभारलेल्या विविध प्रणाली व यंत्र सामुग्री
बेड साईड ऑक्सीजन सिलिंडर्स, ऑक्सीजन सिलिंडर वाहून नेण्याकरिता ‘फ्लो मेटर डीहयुमिडीफायर अँड स्पॅनर विथ ट्रॉलि’ (34), जंबो सिलिंडर 2 बाय 2 – (2), जंबो सिलिंडर 4 बाय 4 – (3), मोठ्या क्षमतेची ऑक्सीजन ड्युरा सिलिंडर प्रणाली (5) ऑक्सीजन जनरेटर – (1), कार्यरत जंबो सिलिंडर करिता आधुनिक कंट्रोल पॅनल (1), 5-एलएमपी इन्बिल्ट नेब्युलायजर सह ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर्स (5), ऑक्सीजन पाइपलाइन / ऑक्सीजन बँक / पाइपिंग इत्यादि (1) ऑक्सीजन पाईपलाइन / टॅंक / पाइपिंग इत्यादि (1),ऑक्सीजन पाइपिंग, लिक्विड ऑक्सीजन टॅंक, कंज्युमेबल कन्सल्टन्सी सर्विस डिझाईन – (1), हॉस्पिटलच्या आवारात डीहयुमिडीफायर ऑक्सीजन पॉईंट्स वॉल्व् आणि एक्सेसरीजसह पायपिंग – (40)
नागरिकांकरिता सेवा सुविधा
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे घरबसल्या मोबाइलवर वैद्यकीय सेवा मिळावी या करिता मेड-ऑन-गो टेलीमेडिसीन ॲपची निर्मिती केली. अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गास व नागरिकांना (21 हजार) एन 95 वॉशेबल मास्कचे वाटप केले.
सार्वजनिक स्वच्छतेकरिता ‘पीएमसी टास्क ॲप’
पुणे महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सीएसआर टीमने पीएमसी टास्क ॲप तयार केले. या ॲपद्वारे ऑनफील्ड कर्मचाऱ्यांना ऑनलाइन ट्रॅक करणे आणि रियल टाइम मॉनिटरिंग करणे सहज शक्य होणार आहे.
मोबाइल क्लिनिक व्हॅन्स
कोरोना काळात सुरुवातीला खासगी दवाखाने बंद असताना नागरिकांच्या सोयीसाठी डॉक्टरांसहित सुसज्ज फिरते दवाखाने पुण्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देत होते. या व्हॅनमध्ये असलेल्या आर्टिफिशियल इंटलीजन्स प्रणालीद्वारे एक्सरेच्या मदतीने 27 हजार 400 रुग्णांचे कोरोना निदान केले. टीमने कोरोना काळातील अडचणींवर मात करून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि यंत्रणा उभारली.
बंधन बँकेचे कोविड-19 विरुद्धच्या युद्धातील योगदान
जंबो सिलिंडर – डॉ.दळवी प्रसूतीगृह येथे बंधन बँकेने मदतीचा हात पुढे केल्यामुळे त्यांच्या सीएसआर फंडातून 16 गुणिले 16 जंबो ऑक्सिजन प्रणाली बसवली व 98 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध केले. अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे पुण्यावरील ताण कमी होण्यास मदत झाली व अनेकांचे प्राण वाचले.
कोविड एड्यूटेनमेंट सिस्टिम
कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवल्यामुळे अनेक जण खचून गेले. त्यांना मानसिक आजाराचा धोका निर्माण झाला. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सीएसआर टीमने बंधन बँकेच्या मदतीने पुणे मनपा हॉस्पिटल्स आणि कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) कोविड एडयूटेनमेंट सिस्टिम्स टीव्ही संचासहित बसविल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्यास मदत झाली व या सिस्टिममुळे त्यांना कोविड विषयीची संपूर्ण माहितीही मिळाली.
कार्डियाक रुग्णवाहिका
रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर शिफ्ट करतांना कार्डियाक रुग्णवाहिकेची आवश्यकता पडते. आयसीयूमधील पेशंटला जसे ऑब्जरव्हेशन आणि मॉनिटरिंग लागते तश्या सर्व सुविधा या कार्डियाक रुग्णवाहिकेत असतात. त्या पार्श्वभूमीवर कार्डियाक रुग्णवाहिकांची व्यवस्था बंधन बँकेच्या साह्यातून केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बँकेने अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसलेल्या कोकणासारख्या दुर्गम भागात, अत्यंत आधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध केली. ही रुग्णवाहिका संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श कार्डियाक रुग्णवाहिका म्हणून गाजली. सीएसआर टीम सोबत ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉक्टर्सचाही या रुग्णवाहिकेच्या डिझाईनमध्ये मोठा वाटा होता.
मोफत फिरते दवाखाने
कोरोना काळात सुरुवातीला खासगी दवाखाने बंद असताना ॲक्सिस बँकेच्या सीएसआर मार्फत नागरिकांच्या सोयीसाठी डॉक्टरांसह सुसज्ज मोफत फिरते दवाखाने पुण्याच्या कंटेन्मेंट झोनमध्ये सेवा देत होते. नंतर हेच काम आरबीएल बँकेमार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मधुमेहाच्या चाचणीसह करण्यात आले. सद्य परिस्थितीत हे काम एचडीएफसी बँकेच्या सीएसआरमधून सुरू आहे. आतापर्यंत या मोफत फिरत्या दवाखान्यांचा लाभ १ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला आहे व जानेवारी २०२१ अखेरपर्यंत साधारणपणे दोन लाख लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचलेला असेल. सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीममध्ये अशा प्रकारची सेवा एखाद्या शहरी भागात कार्यरत असलेल्या दवाखान्यात देण्यासाठी प्रतिरुग्ण ३०० रुपये खर्च केले जातात व रुग्णाला मोफत सेवा दिली जाते.
ह्या अनोख्या पायलट प्रोजेक्टमध्ये अत्यंत दुर्गम ग्रामीण भागात जिथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नाही, अशा जागी प्रतिरुग्ण २०० रुपयांहूनही कमी खर्चात सीएसआरच्या माध्यमातून मोफत सेवा पुरवण्यात आली. प्रशिक्षीत डॉक्टरांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात आली आहे. या फिरत्या दवाखान्यांमध्ये अनेक सामान्य आजारांवरची औषधे रुग्णाला देण्यात येतात. तसेच मधुमेहासकट अधिक ४ चाचण्याही करण्यात आल्या आहेत. हे करत असताना एक धक्कादायक बाब अशी समोर आली आहे की, साधारणपणे २५ ते ३५ टक्के नागरिकांमध्ये मधुमेहाचा प्रादुर्भाव जाणवला. या लोकांना आपल्याला मधुमेह आहे याची जाणीवच नव्हती. ही सर्व सेवा प्रदान करीत असताना प्रत्येक जागी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर वापरण्यात आली व त्यामुळे अत्यंत दर्जेदार मेडिकल सेवा पुरवण्यात आली. हेच काम राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कायमस्वरुपी महाराष्ट्रात करण्याची संकल्पनाही आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या समोर मांडली आहे व या संकल्पनेला मूर्त स्वरुप आल्यास असा क्रांतीकारक प्रयोग करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल.
आर्टिफिशियल इंटेलीजन्स
ए आय(60) सुरूवातील आरटीपीसीआर टेस्ट खूप महाग होती आणि त्याची कमतरताही जाणवत होती. यावर पर्याय शोधण्यासाठी सीएसआर टीम ससून हॉस्पिटलच्या टीमच्या मदतीने पुढे सरसावली. यामध्ये त्यांना पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, ससून रेडिओलॉजीच्या विभाग प्रमुख डॉ. शेफाली पवार आणि ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांचे विशेष सहकार्य मिळाले. या सगळ्यावर विचारमंथन सुरू असताना सीएसआर टीमची गाठ पुण्यातील काही तरुणांशी पडली. हे तरुण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करुन कोरोनाच्या रुग्णांचे निदान करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यातूनच मग कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस्ड एक्स-रे आणि सीबीसी वापरुन प्राथमिक तपासणी करुन घेण्याची संकल्पना पुढे आली. ‘थिंकस्मार्ट’ या कंपनीने ही ए आय प्रणाली विकसित केली आहे. थिंकटँक या कंपनीचे आर्टिफीशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर जपानसह इतर मोठ्या देशांमध्ये साबयर क्राईम, मिलिटरी वापरासाठी उपयोगात येते.
या प्रणालीमुळे १६ आजारांचे निदान होते. यामध्ये 1. अटेलेक्टॅसीस, 2. पल्मोनरी कन्सॉलिडेशन, 3. इन्फ्लीट्रेशन, 4. न्यूमोथोरॅक्स, 5. एडिमा, 6. एम्फिसीमा, 7. फायब्रॉसिस, 8. एफ्युजन, 9. न्युमोनिया, 10. प्लुरल थिकनिंग, 11.कार्डिओमेअली, 12. नॉड्युल मास, 13. हर्निया, 14. ट्युबरक्युलासिस, 15. कोविड-१९, १६. ब्रांकीयाटीसीस यासारख्या आजारांचा समावेश आहे. तसेच याद्वारे रक्तातील रेड ब्लड सेल काऊंट, हिमोग्लोबिन, हेमॅटोक्रीट, व्हाईट ब्लड सेल काऊंट आणि प्लेटलेट मोजले जातात. या आर्टिफिशियल इंटलीजन्स प्रणालीद्वारे सीआरएस टीमने एक्सरेच्या मदतीने 32 हजार 400 रुग्णांचे कोरोना निदान केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने कोरोना काळातील अडचणींवर मात करून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना आणि यंत्रणा उभारली. आर्टिफिशीअल इंटेलिजन्स एक्सरे, सीपीसी एनालायझर ही उपकरणे जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा समावेश राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये केला गेला तर महाराष्ट्रात एक वैद्यकीय क्रांती घडून येऊ शकते. तसेच यामधून येणाऱ्या निष्कर्षांवरुन कुपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या भागात शालेय पोषण आहारात समतोल राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करता येऊ शकतात.