महाराष्ट्र मुंबई रोजगार हेडलाइन

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी; ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

Summary

मुंबई दि. २० : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय […]

मुंबई दि. २० : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये (एलएमव्ही) हलकी वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तेथे शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ८ हजार आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 

कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी दिली. तर तीन टप्प्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत.

राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. तसेच राज्य शासनाकडे आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील ज्ञान, अनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उद्योग समूहांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुढच्या काळात या अनुषंगाने अनेक रोजगाराभिमुख सामंजस्य करार होतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे सह संचालक सतीश सूर्यवंशी, टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष रमेश राव, कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक भास्कर पै आणि मुख्य व्यवस्थापक रवी  सोनटक्के उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *