पोलिस पाटलासह पाच जणांनी मनोरुग्णाची केली हत्या लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल विरली (खुर्द) गावातील धक्कादायक घटना
Summary
लाखांदूर : मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एका मनोरुग्णाची गावातील काही व्यक्तींनी निर्दय मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील विरली (खुर्द) येथे घडली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिस पाटलासह पाच जणांविरुद्ध हत्या आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात […]
लाखांदूर : मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एका मनोरुग्णाची गावातील काही व्यक्तींनी निर्दय मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील विरली (खुर्द) येथे घडली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिस पाटलासह पाच जणांविरुद्ध हत्या आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीची ओळख बुद्धीमान नंदराम धनविजय (वय ३५, रा. विरली खुर्द) अशी आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत धनविजय हे गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते. या कारणामुळे गावातील काही महिला आणि नागरिक त्यांच्यामुळे त्रस्त असल्याचे सांगण्यात येते. घटनेच्या दिवशी मनोरुग्णाने पानठेल्यावर बसलेल्या पोलिस पाटील योगेश राऊत (वय ४३) यांच्याशी वाद घालत इंट्यांचा तुकडा फेकून मारल्याचा आरोप आहे.
या प्रकारानंतर संतापलेल्या पोलिस पाटलाने अजय मेश्राम (३०), सौरभ प्रधान (१९), रामेश्वर ठाकरे आणि लोकेश ठाकरे (२६) या साथीदारांसह मनोरुग्णाला पकडून लाकडी दांडक्याने तसेच हातांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या धनविजय यांना त्यांच्या घराजवळ सोडण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी उपचाराअभावी प्राण सोडले.
घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमार्टम अहवालात मृताच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय बळावला.
थानेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आशीष गंद्रे, उपनिरीक्षक निशांत जनोनकर यांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासात पोलिस पाटीलसह चार जणांनी मिळून मनोरुग्णाला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी हत्या, अॅट्रॉसिटी कायदा व इतर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत.
—
तहसीलमध्ये हत्यांची मालिका – नागरिकांत भीतीचे वातावरण
लाखांदूर तालुक्यात मागील काही दिवसांत विरली (बु.) आणि आथली या गावांमध्ये दोन वेगवेगळ्या हत्यांच्या घटना घडल्या होत्या. त्या दोन्ही घटनांना पंधरवडाही लोटला नाही तोच विरली (खुर्द) मध्ये आणखी एक हत्या घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. सलग तीन हत्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
—
संकलन:- श्री गणेश सोनपिंपळे, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
