पैशाच्या वादातून भीषण हत्याकांड : नरेश दुनेदार यांचा नहरमध्ये बुडवून खून
 
				लाखांदुर (प्रतिनिधी) —
लाखांदुर तालुक्यातील विरली (बु) शिवारात पैशाच्या चोरीच्या संशयातून एक थरारक हत्या घडली आहे. या घटनेत स्थानिक रहिवासी नरेश दुनेदार (मृतक) यांना नहरमध्ये बुडवून ठार मारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ही धक्कादायक घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारास ३ वाजता घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक नरेश दुनेदार आणि आरोपी नारायण मेश्राम हे दोघेही त्या दिवशी दुपारी विरली (बु) परिसरातील नहरावर मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी दोघेही मद्याच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. माश्या पकडताना पैशांच्या चोरीवरून त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
साक्षीदारांच्या मते, आरोपीने मृतकावर अत्याचार करून त्याला मारहाण केली आणि रागाच्या भरात त्याला नहरात ओढत नेत पाण्यात बुडवून ठार केले. घटनेनंतर काही स्थानिकांनी हा प्रकार पाहून त्वरित पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच थानेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जयेश जवंजारकर, अंमलदार निलेश चव्हाण, विकास रणदिवे, भूपेंद्र बावनकुळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आरोपीला अटक केली.
या प्रकरणी लाखांदुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
—
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, नहर परिसरात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाइल फोनमध्ये या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपीकडून मृतकावर झालेल्या निर्दयी मारहाणीचे दृश्य स्पष्टपणे दिसत असून, त्यानंतर नहरातून मृतदेह बाहेर काढताना नागरिकांचे दृश्यदेखील कैद झाले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारेही तपास सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
—
न्यूज रिपोर्टर:- गणेश सोनपिंपळे
