१६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे पार पडलेला धम्मदीक्षा समारंभ
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे भिक्कू महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षा घेऊन आपल्या ५ लाख अनुयायांसोबत बौद्धधम्मात प्रवेश केला हा इतिहास सर्वपरिचित आहे. जगाच्या इतिहासातील ही एक अतिशय अपूर्व घटना होती. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अन्यायमूलक व अमानवीय प्रथांची बंधने झुगारून न्यायाधिष्ठीत मानवतावादी समाजाची प्रतिष्ठापना करून देणाऱ्या या सोनेरी क्षणांचा विदर्भवासीयांना विशेषत्वाने अभिमान असायला हवा. त्यासोबतच १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर(तत्कालीन चांदा) येथे डॉ. आंबेडकरांच्याच हातून पार पडलेल्या दूस-या धर्मपरिवर्तनाचीसुद्धा दखल घेणे तितकेच गरजेचे आहे.
खरं तर, नागपूरच्या पुढे पूर्व विदर्भात येण्याची डॉ. आंबेडकरांची ही पहिली वेळ नव्हती. १९५४ ची निवडणूक बाबासाहेबांनी भंडारा मतदारसंघातून लढवली होती, ज्यात भंडारा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे ब्रम्हपुरी, चिमूर हे मतदारसंघ सामाविष्ट होते. तेव्हा भर उन्हाळ्यात २९ एप्रिल १९५४ या दिवशी डॉ आंबेडकरांनी पवनी आणि वडसा इथे सभा घेतल्या होत्या. पवनी येथील सभेत बाबासाहेबांनी तेथील प्राचीन बौद्धकालीन पवित्र नगरीचा गौरवपूर्ण उल्लेखसुद्धा त्यांच्या भाषणात केला होता. वडस्याला जाताना नागभीडच्या जुन्या बसथांब्यावर असलेल्या गावंडे यांच्या उपहारगृहात त्यांनी काही क्षण विश्रांती आणि अल्पहार घेतला होता. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना आपल्या समस्या सांगितल्या व त्यासंबंधीची निवेदने सादर केली. वडसा येथील त्यांची सभा अपेक्षेप्रमाणे प्रचंड गर्दीसह गाजली होती. परंतु दुर्दैवाने अनुसूचित जातीच्या गटातूनच बाबासाहेबांना अनपेक्षित असा पराभव पत्करावा लागला.
चंद्रपूरचे देवाजी खोब्रागडे हे आंबेडकरी चळवळीचे एक खंदे कार्यकर्ते होते. डॉ आंबेडकरांचे मानसपुत्र आणि पुढे राज्यसभेचे सदस्य व नंतर उपसभापती (१९६९-७२) झालेले बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे (१९२५-८५) हे त्यांचेच चिरंजीव. नागपूरला धर्मपरिवर्तन सोहळा आयोजित होत असताना या खोब्रागडे परिवाराने तसाच एक दीक्षा ग्रहण सोहळा चंद्रपूरलासुद्धा करण्याची गळ बाबासाहेबांना घातली. आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी बाबासाहेबांनी ही मागणी मान्य केली.
१४ ऑक्टोबर १९५६ चा नागपूरचा सोहळा पार पडल्यानंतर १६ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता डॉ. बाबासाहेब हे माईसाहेब, नानकचंद रत्तू व बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्यासह नागपूरहून निघाले. नागपूरहून चंद्रपूरला जाण्याचा नेहमीचा ‘नागपूर-बुटीबोरी-जाम-वरोरा-चंद्रपूर’ हा मार्ग टाळून ‘नागपूर-उमरेड-नागभीड-मुल-चंद्रपूर’ या मार्गाने बाबासाहेबांना मोटारीने चंद्रपूरला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे झाडीपट्टीतून जाणारा हा मार्ग या महामानवाच्या भेटीने आणि चरणस्पर्शाने पुनीत झाला. याच मार्गावर असलेल्या नागभीडला या दिवशी या महापुरुषाच्या दर्शनाचे पुण्य दुस-यांदा लाभले. बाबासाहेबांची प्रकृती तेव्हा खालावलेली होती. त्यांच्या संघर्षमयी जीवनाप्रमाणे हा मार्ग सुद्धा खूप खाच-खळग्यांचा असल्याने त्यांना प्रवासात खूप त्रास होत होता, त्यामुळे त्यांना खूप वेळा थांबावेसुद्धा लागले होते. देवाजी खोब्रागडे आणि काही कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला मुल पर्यंत येऊन थांबले होते. मुलच्या विश्राम गृहात त्यांनी दुपारचे जेवण घेतले तेव्हा त्यांना जवळच राहत असलेल्या गोवर्धन नावाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी तयार केलेली ज्वारीची भाकर आणि पिठले देण्यात आले होते. विश्रांतीनंतर दुपारच्या सुमारास मूलवरून सरळ चंद्रपूरच्या सरकारी सर्किट हाऊसवर बाबासाहेब आले, तेव्हा दुपारचे ४ वाजले होते.
सायंकाळी ७ वाजता थकलेले बाबासाहेब धम्मदीक्षेच्या नियोजित स्थळी (जुन्या वरोरा नाक्याजवळ) त्यांच्या प्रसिद्ध अश्या धम्मकाठीच्या आधाराने आले. (नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही सोहळ्यात आणि प्रवासात त्यांच्या हातात असलेली ही अष्टांगिक काठी अजूनही नागपूरला मेंढे कुटुंबाकडे आहे) तेव्हा बाबासाहेबांच्या जयजयकाराने शुभ्रवस्त्रधारी वातावरण दुमदुमून गेले होते. सिरोंचा, अहेरी, आरमोरी, बल्लारशाह, चिमूर, गडचांदूर, गढी सुर्ला, पोंभुर्णा, नवरगाव, मुल, वरोरा, भद्रावती, चामोर्शी, गडचिरोली, नागभीड या भागातील कार्यकर्ते महिनाभर या सोहळ्यासाठी अहोरात्र घाम गाळत होते. समता सैनिक दलाने या मैदानावर अत्यंत चोख व कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
बाबासाहेबांनी लोकांना ‘उठा, उभे रहा’ असा आदेश दिला. ऑक्टोबर महिन्यातसुद्धा पाऊस झाल्याने मैदानावर ट्यूबलाईट भोवती खूप किडे भिरभिरत होते. उत्साही आयोजकांनी किडे घालवण्याचा प्रयत्न केला पण त्यात सर्वच लाईटस बंद होऊन संपूर्ण अंधार झाला. त्यावेळेस प्रसंगावधान राखून तात्काळ समता सैनिक दलाचा एक तरुण कार्यकर्ता ‘दादाजी त्रिसुले’ पेटता बल्ब हातात धरून मंचाजवळ उभा झाला. त्या साध्या बल्बच्या उजेडात स्वतः बाबासाहेबांनी ‘बुद्धं शरणं गच्छामि’ अशी भारतभूमी मधेच वाढलेल्या महान बौद्धधर्माची दीक्षा देऊन त्यांच्या अनुयायांना आणि त्यांच्या पुढील सर्व पिढ्यांना तेजोमय असा प्रकाशित मार्ग दाखवला. जवळपास अडीच लाख अनुयायांनी अनुभवलेला व अगदी रोमांचकारी वाटावा असा हा नाट्यमय प्रसंग होता. बाबासाहेबांचे नागपूरला भाषण झाले असल्याने परत चंद्रपूरला भाषण न देता आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा त्यांनी दिल्या.
१७ तारखेला प्रकृती बरी नसल्याने बाबासाहेबांनी पूर्ण दिवस सर्किट हाऊस मध्येच विश्राम केला. खोब्रागडे कुटुंबाच्या विनंतीखातर फक्त माईसाहेबांना त्यांच्या घरी पाठवले. त्या दिवशी कार्यकर्त्यांसमोर ‘भद्रावती’ या प्राचीन बौध्दनगरीच्या संपन्नतेचा उल्लेख करून पुढच्या वेळेस त्यासंदर्भात माहितीपूर्ण भाषण देण्याचा मनोदय बाबासाहेबांनी जाहीर केला. १८ तारखेला डॉ आंबेडकर ‘ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस’ने नागपूरला व तेथून पुढे दिल्लीला निघून गेले. नंतर मात्र ते कधीच विदर्भात परत येऊ शकले नाहीत. केवळ दिड महिन्यानंतर ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. कोट्यवधी जनतेचे आयुष्य शिक्षण व संघटन यांच्या सहाय्याने अहिंसक, घटनात्मक व लोकशाही मार्गाने बदलून त्यांना दारिद्रय आणि शोषण यांच्या खोल गर्तेतून बाहेर काढणाऱ्या या महामानवाच्या संघर्षमय आयुष्यातील शेवटची आणि सर्वात मोठी अभूतपूर्व घटना पूर्व विदर्भात झालेली आहे हे जगाला सांगायचा आमचा हा छोटासा प्रयत्न.
