विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्यांचा आदर्श विचार पुढे न्यावा – सरन्यायाधीश भूषण गवई
Summary
नाशिक, दि. 27 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार व संविधानाची तत्वे आपणास कायम मागदर्शक ठरली आहेत. कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्ये स्वीकारून प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल यादृष्टीने दक्ष राहून वाटचाल करावी, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश […]
नाशिक, दि. 27 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार व संविधानाची तत्वे आपणास कायम मागदर्शक ठरली आहेत. कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्ये स्वीकारून प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल यादृष्टीने दक्ष राहून वाटचाल करावी, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
सरन्यायाधीश श्री. गवई यांनी आज येथील एनबीटी विधी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती श्रीचंद्रशेखर, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती अश्विन भोबे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर.पी.देशपांडे, सचिव दिप्ती देशपांडे, प्राचार्य ए.जे.कादरी समन्वयक भारत कौरानी, डॉ.संजय मांडवकर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले की, संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा एक भाग आहे. माझ्या शिक्षणाची सुरूवात महापालिका शाळेपासून झाली व आज या पदावर पोहचण्याचे सर्व श्रेय संविधानाचे असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी प्रगतीपथावर पोहोचलो आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली ध्येये निश्चित करावीत. उच्च ध्येय ठेवल्यास निश्चितच आपल्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल, असा सल्ला सरन्यायाधीश श्री. गवई यांनी विद्यार्थांना दिला.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शहीद भगतसिंग यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी वेचले. त्याप्रमाणे विधी क्षेत्रात ज्ञान संपादन करून त्याचा लाभ समाजासाठी होईल. तसेच विधीक्षेत्र व समाजाची प्रतिमा मलीन होणार नाही यादृष्टीने विद्यार्थांनी वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.

न्यायमूर्ती श्री. कर्णिक म्हणाले की, सरन्यायाधीश श्री. गवई यांचा विनम्रता, साधेपणा शिकण्यासारखा आहे. त्यांचे मार्गदर्शन निश्चितपणे विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल.
संस्थेत संविधानाच्या उद्देशिकेच्या कोनशीलेचे अनावरण सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या हस्ते झाले हा संस्थेसाठी हा गौरवाचा क्षण आहे. कायद्याचा अभ्यास व वेळेत न्यायदान ही सरन्यायाधीश श्री. गवई यांची कार्यशैली असून विद्यार्थ्यांनी याचा अवलंब करावा. असे संस्थेच्या सचिव श्रीमती देशपांडे प्रास्ताविकात म्हणाल्या.
