BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मंत्रालयात नवतेजस्विनी प्रदर्शन २०२५ संपन्न

Summary

मुंबई, दि. २७ : महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात भरविण्यात आलेले ‘नवतेजस्विनी प्रदर्शन २०२५’ उत्साहात संपन्न झाले. माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका राजलक्ष्मी शाह म्हणाल्या की, नवतेजस्विनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉल हा महिलांची कल्पकता, […]

मुंबई, दि. २७ : महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात भरविण्यात आलेले ‘नवतेजस्विनी प्रदर्शन २०२५’ उत्साहात संपन्न झाले.

माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका राजलक्ष्मी शाह म्हणाल्या की, नवतेजस्विनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉल हा महिलांची कल्पकता, जिद्द आणि सामूहिक उद्यमशक्तीचे प्रतीक आहे. महिलांना कार्यात्मक साक्षरता, कौशल्य प्रशिक्षण आणि बँक कर्ज उपलब्ध करून उद्योजिका घडविण्याचे काम माविम करत आहे. यामुळे समाजाचेही सकारात्मक परिवर्तन होत आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध झाली, विक्री वाढली तसेच पर्यावरणपूरक उत्पादनांना चालना मिळाली. नवतेजस्विनी प्रदर्शन २०२५ हा ग्रामीण महिलांचे परिश्रम, उद्यमशीलता आणि स्वावलंबनाचा यशस्वी उत्सव ठरला.

२३ ते २६ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत संपन्न झालेल्या प्रदर्शनास मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी, मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आणि ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांची विक्री समाधानकारक झाली.

या प्रदर्शनात राज्यभरातील बचत गटांनी सादर केलेल्या वस्तूंना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंद्रपूरच्या बांबूच्या वस्तू, गोंदियाच्या लाखेच्या बांगड्या, ठाण्याची वारली कला, जुन्या कॅलेंडर पेपरपासून तयार केलेले दागिने तसेच अकोल्याची पारंपरिक गुळपट्टी यासारख्या उत्पादनांनी विशेष आकर्षण निर्माण केले.

ग्राहकांनी उत्पादनांबाबत आपले अनुभवही व्यक्त केले. एका तरुण ग्राहकाने सेंद्रिय उत्पादनांचे पौष्टिक मूल्य अधोरेखित केले तर एका ज्येष्ठ नागरिकाने गुळपट्टीचा स्वाद आपल्याला बालपणाच्या आठवणींमध्ये नेतो असे सांगितले. पर्यावरणपूरक व टिकाऊ उत्पादनांना प्रतिसाद मिळाला.

स्वयंसहाय्यता गटातील उद्यमशील महिलांनी सांगितले की, माविमने दिलेल्या या संधीमुळे त्यांच्या उत्पादनांना नवी बाजारपेठ मिळाली. काही ग्राहकांनी पुन्हा खरेदीसाठी संपर्क साधल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *