प्रशासनाने स्वत:हून व वेळेवर केलेल्या कारवाईमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी रोखली गेली
Summary
मुंबई, दि. 19: राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी प्रकरणाबाबत वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, कार्यालय चंद्रपूर यांनी पुढील बाबी निदर्शनास आणल्या आहेत. राजूरा विधानसभा मतदारसंघाचे, मतदार नोंदणी कार्यालयात 1 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत एकूण 7,592 नवीन मतदार […]
मुंबई, दि. 19: राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी प्रकरणाबाबत वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, कार्यालय चंद्रपूर यांनी पुढील बाबी निदर्शनास आणल्या आहेत.
राजूरा विधानसभा मतदारसंघाचे, मतदार नोंदणी कार्यालयात 1 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत एकूण 7,592 नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) सदर अर्जांची तपासणी केली असता, यात अर्जदार दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसणे, अर्जदार अस्तित्वात नसणे तसेच आवश्यक छायाचित्रे व पुरावे जोडलेले नसणे या त्रुटी निदर्शनास आल्या.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणीअंती सदर 7,592 अर्जांपैकी 6,861 अर्ज अवैध ठरविण्यात आले. या अर्जांची मतदार यादीत नोंद करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाची जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांनी त्याच वेळेस गंभीर दखल घेऊन मतदार नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी, राजुरा यांना सर्वच अर्जांची सखोल चौकशी करण्याचे व लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत आवश्यक ती गुन्हेगारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर निर्देशांच्या अनुषंगाने राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.629/2024 नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे.
मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाद्वारे स्वत:हून व वेळेवर केलेल्या कारवाईमुळे 6,861 बनावट अर्ज रद्द होऊन या नावांचा 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समावेश होवू शकलेला नाही.
मतदार नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांनी दक्षता व वेळेवर घेतलेल्या तत्काळ कारवाईमुळे 70, राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न यशस्वीरित्या रोखण्यात आले आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
