चंद्रपूरात ‘नया दौर – पुरानी यादें’ संगीत महोत्सव संपन्न
चंद्रपूर, दि. 14 सप्टेंबर :
एस. के. फिल्म प्रोडक्शन आणि ब्लॅक गोल्ड म्युझिकल इव्हेंट्स चे डायरेक्टर श्री. सुदेश दिलीप भालेकर वतीने रविवार, दि. 14 सप्टेंबर रोजी प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपूर येथे ‘नया दौर – पुरानी यादें’ हा भव्य संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात चंद्रपूरातील नवोदित कलाकारांना गाण्याची आणि नृत्याची संधी मिळाली. विविध आकर्षक नृत्याविष्कारांबरोबरच ‘चंद्रपूरचा पुष्पा’ हे विशेष आकर्षण ठरले. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभागृह गजबजून टाकले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर न्यायालयातील मुख्य दंडाधिकारी मा. श्री. प्रशांत कुलकर्णी, मा. श्री. दत्तप्रसंन्न महादानी, मा. छबुताई वैरागडे यांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन रिद्धी राऊत आणि अशोक स्वर्णकार यांनी केले.
या संगीतमय सोहळ्याचे प्रमुख आयोजक एस. के. फिल्म प्रोडक्शनचे डायरेक्टर व प्रोड्युसर श्री. सुदेश भालेकर व श्रीमती सारिका भालेकर होते. सह-आयोजक म्हणून श्री. नितीन नंदनवार आणि श्री. शब्बीर शेख यांचे विशेष योगदान लाभले. तसेच श्री. सागर अनंदनकर, कोरिओग्राफर व डान्सर टीम, प्रियदर्शनीचे व्यवस्थापक श्री. येरणे सर व त्यांची टीम, एलईडी – अजय नंदुरकर, साउंड – हजारे सर व बाळुभाऊ यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचा सहभाग होता.
ऑडिशन दरम्यान नवोदित गायकांची निवड जज पॅनेलमधील श्री. अनिल देशपांडे, श्री. किशोर तळवेकर आणि श्री. दुष्यंत नगराळे यांनी केली होती.
आयोजक श्री. व श्रीमती भालेकर यांनी पुढेही अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना प्रोत्साहन देण्याचा विश्वास व्यक्त केला.
