BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

वाशिम जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दूरदृश्यप्रणालीद्वारे सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन

Summary

मुंबई दि. १७ : वाशिम जिल्ह्याला अधिक सुसज्ज व सेवाभिमुख बनवण्यासाठी शासनाच्या सेवा जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणं महत्त्वाचे आहे. सेवा पंधरवडा म्हणजे फक्त योजनांचा आराखडा नाही, तर शासनाच्या संवेदनशीलतेचे आणि उत्तरदायित्वाचे प्रतिक आहे. या उपक्रमाचा लाभ सामान्य नागरिक, शेतकरी आणि घराचे स्वप्न […]

मुंबई दि. १७ : वाशिम जिल्ह्याला अधिक सुसज्ज व सेवाभिमुख बनवण्यासाठी शासनाच्या सेवा जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणं महत्त्वाचे आहे. सेवा पंधरवडा म्हणजे फक्त योजनांचा आराखडा नाही, तर शासनाच्या संवेदनशीलतेचे आणि उत्तरदायित्वाचे प्रतिक आहे. या उपक्रमाचा लाभ सामान्य नागरिक, शेतकरी आणि घराचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला मिळायला हवा. या अभियानात सर्व अधिकारी, कर्मचारी, जनप्रतिनिधी व नागरिक यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल, असे मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिनानिमित्त आजपासून २ ऑक्टोबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाची सुरुवात केली.

“शासनाच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे हेच उद्दिष्ट असावे. सेवा पंधरवडामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार असल्याचे सर्वांनी जोमाने काम करावे. तसेच तीन टप्प्यात होणाऱ्या सेवा पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ वाटप व सेवा द्याव्यात” असे आवाहन मंत्री भरणे यांनी यावेळी केले.

सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत वाशीम जिल्ह्यात पाणंद रस्ते विषयक मोहिमेंतर्गत शिवार फेऱ्यांचे आयोजन करणे, गाव नकाशांवर नोंद असलेल्या व नसलेल्या रस्त्यांचे वर्गीकरण करणे, शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे तसेच विशिष्ट क्रमांक निश्चित करणे, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही करणे यासारख्या बाबी राबविण्यात येणार आहेत. तसेच ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत शासकीय जमिनीवरील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे, पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप आदींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे.

सेवा पंधरवडा अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याव्दारे विविध नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आलेल्या असून त्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहेत. What’s app द्वारे नागरिकांना प्रमाणपत्र, दाखले, तक्रार निवारण यांसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. ऑनलाईन सदनिका विक्री नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा उपलब्ध होणार आहेत. या कालावधीत सामाजिक सहाय्याच्या योजना राबवून डीबीटीव्दारे थेट खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे. लोकअदालत, पेन्शन केसेस, शिधापत्रिका वाटप, वैद्यकीय उपचार दाखला देणे, आयुष्यमान भारत कार्ड देणे यांसारखे उपक्रम याअभियानांतर्गत राबविण्यात येऊन पुढे या सेवा सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता व ब्लॉकचेन या तंत्रज्ञानांचा तसेच जिओ टॅगिंगचा वापर करून शासकीय संसाधनांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांना अनेक सुविधा थेट ऑनलाईन उपलब्ध होऊन जीवनमान सुकर होणार आहे.

या सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या योजना, सेवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेऊन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी विधानपरिषद आमदार किरण सरनाईक, विधानसभा आमदार सईताई डाहाके, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिल्पा सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *