‘नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता’ या विषयावरील प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन
मुंबई, दि १६ : सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित “नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता” या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात भारत सांस्कृतिक महासत्ता म्हणून ओळखला जात आहे. “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेतून देशातील विविधतेला एकात्मतेत रूपांतरित करताना त्यांनी भारताची सांस्कृतिक ताकद जगासमोर प्रभावीपणे उभी केली.
“नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता” या उपक्रमांतर्गत भारतीय संस्कृतीचे वैभव, विविधतेतून एकता आणि परिवर्तनाचे दर्शन घडविणाऱ्या निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते होणार असून हे प्रदर्शन दि. २३ सप्टेंबर पर्यंत सकाळी ११.०० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले असेल. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ज्येष्ठ अभिनेते आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक दीपक करंजीकर यांचे “नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता” या विषयावरील व्याख्यान लघुनाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले असून हे व्याख्यान रसिकांना नवा विचार देणारे ठरणार आहे. त्यानंतर प्रभात फिल्म्स निर्मित ऐतिहासिक ‘संत तुकाराम’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन होणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर रसिकांना संधी उपलब्ध होईल. तसेच हे प्रदर्शन विनामूल्य असून त्याचा लाभ जास्तीत-जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड .शेलार यांनी केले आहे.
००००
