BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुंबई उपनगरात अत्याधुनिक सुविधांसह क्रीडा संकुल उभारणार – मंत्री ॲड. आशिष शेलार राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा गौरव

Summary

मुंबई, दि. २०: मुंबई उपनगर जिल्ह्यातही आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणारे खेळाडू आहेत. भविष्यात असे अनेक खेळाडू तयार व्हावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष […]

मुंबई, दि. २०: मुंबई उपनगर जिल्ह्यातही आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणारे खेळाडू आहेत. भविष्यात असे अनेक खेळाडू तयार व्हावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार दिली. जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

क्रीडा व युवक कल्याण विभागांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यावतीने पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त बांद्रा (पूर्व) येथील उत्तर भारतीय संस्था हॉलमध्ये आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार अध्यक्षस्थानवरुन बोलत होते.

यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ काटियार, जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू एन. स्वामी रंगास्वामी, (समर ऑलिंपिक सहभागी) तसेच द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू विपुल घोष उपस्थित होते.

कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध खेळातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ११ महिला व पुरुष खेळाडूंना तसेच छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना गौरविण्यात आले. याशिवाय पारंपरिक खेळाचा वारसा जपणाऱ्या दहीहंडी पथकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये पार्ले स्पोर्ट्स महिला गोविंदा पथक (सात थरांचा विश्वविक्रम), कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक (दहा थरांचा विश्वविक्रम) यांचा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी योगा आणि दहीहंडी यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी काटियार यांनी जिल्ह्यातील क्रीडा उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडाक्षेत्रातही प्रगती करावी. जिल्हा , राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक करा. शासनामार्फत खेळाडूना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *