सीटीपीएसमधील ‘हाऊसकीपिंग’ कंत्राटात घोटाळा? – अधिकार्यांच्या संगनमताचा आरोप

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्र (सीटीपीएस) येथील हाऊसकीपिंग कंत्राट प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा व भ्रष्टाचार झाल्याचे धक्कादायक आरोप पुढे येत आहेत. नवे नियम लागू करून निवडक कंत्राटदारांना फायदेशीर अटी घालण्यात आल्याचा आरोप होत असून, यामागे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची चर्चा जोरात आहे.
नियम फक्त कागदावर पारदर्शक?
सीटीपीएसमध्ये हाऊसकीपिंग सेवेसाठी नव्या अटी व नियमांची अंमलबजावणी केल्याचा दावा प्रशासन करत असले तरी, प्रत्यक्षात हे नियम काही ठराविक कंत्राटदारांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली काही फॉर्मवर ‘एकच पात्र कंत्राटदार’ निवडला जातो, तर इतरांना प्रक्रियेतून बाहेर ठेवले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
लाखो रुपयांचा गैरव्यवहार?
नव्या नियमांमुळे हाऊसकीपिंग कंत्राटांचे दर अनाठायी वाढवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. काही अधिकाऱ्यांनी ठराविक कंत्राटदारांसोबत संगनमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ घेतल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.
तक्रारी असूनही कारवाई नाही
कंत्राटदारांनी आणि काही कर्मचाऱ्यांनी या संदर्भात लेखी तक्रारी दिल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट तक्रार करणाऱ्यांवर दबाव आणून त्यांना गप्प बसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सखोल चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. जर चौकशी करून घोटाळ्याचा पर्दाफाश झाला नाही, तर मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सीटीपीएसमधील या संशयास्पद घडामोडीमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, “हाऊसकीपिंगच्या नावाखाली चालणारा भ्रष्टाचार तातडीने थांबवावा,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.