BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summary

मुंबई, दि. २३ – राज्यभर रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून मुख्यमंत्री म्हणून मला आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या आहेत. यामध्ये बहिणींचे निस्सीम प्रेम आणि आशीर्वाद आहेत. महिलांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात […]

मुंबई, दि. २३ – राज्यभर रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून मुख्यमंत्री म्हणून मला आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या आहेत. यामध्ये बहिणींचे निस्सीम प्रेम आणि आशीर्वाद आहेत. महिलांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात असून महिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर राहिल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठविल्या, रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम दादर येथील योगी सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे उद्दिष्ट समोर ठेवले असून हा विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नसल्याचे सांगून पंतप्रधानांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘बेटी बचाव’ पासून ‘लखपती दीदी’ पर्यंत अनेक योजना राबविल्या आहेत. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून राज्यात मागील वर्षी २५ लाख भगिनी लखपती बनल्या असून राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षीही तितक्याच महिला लखपती बनणार असून एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात १५०० रुपयांच्या निधीतून भगिनी स्वावलंबनाचे नवे मार्ग शोधत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केला. महिला सक्षम झाल्या तर परिवार आणि समाज सक्षम होतो. महिलांच्या आर्थिक क्रियाशीलतेवर प्रकाश टाकताना विविध माध्यमांतून महिलांना दिलेले कर्ज शंभर टक्के वसूल झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शासन लवकरच महिला सहकारी संस्थांना हक्काचे काम देणार आहे. उद्योग, व्यवसाय, क्षेत्रांत महिलांना प्रोत्साहन देण्यात येत असून राज्यात येत्या पाच वर्षांत महिलांसाठीची एकही योजना बंद होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *