BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अंकल -आम्हाला ही चांगली सडक बनवून द्याना सायखोड शिरमी येथील चिमुकल्यांची हाक सायखोड (शिरमी) येथे प्राथमिक शाळेसह पायाभूत सुविधा देण्याची मागणी “निवासी पट्टे, पक्के रस्ते, नाल्या आणि घरकुल योजनांचा लाभ केव्हा?” — प्रज्वल धोटे

Summary

काटोल/कोंढाळी : कोंढाळी नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ मधील सायखोड (शिरमी) येथील नागरिकांना प्राथमिक सुविधा मिळवण्यासाठी अक्षरशः वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४७, आशियाई महामार्ग ४६ आणि राष्ट्रीय महामार्ग ५३/६ यांच्या संगमाजवळ असलेल्या या भागात वाहतूक २४x७ […]

काटोल/कोंढाळी :
कोंढाळी नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ मधील सायखोड (शिरमी) येथील नागरिकांना प्राथमिक सुविधा मिळवण्यासाठी अक्षरशः वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४७, आशियाई महामार्ग ४६ आणि राष्ट्रीय महामार्ग ५३/६ यांच्या संगमाजवळ असलेल्या या भागात वाहतूक २४x७ सुरू असते. अशा धोकादायक परिस्थितीतही येथील नागरिकांना अजूनही पक्के रस्ते, नाल्या, निवासी पट्टे आणि घरकुलाचा लाभ मिळालेला नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सायखोड (शिरमी) येथील वस्ती गेली सुमारे ६५ वर्षांपासून अस्तित्वात आहे. १३६५ पेक्षा जास्त लोकसंख्येच्या या भागात अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी, शिकलकर आणि इतर सर्व समाजातील नागरिक एकत्र राहतात. त्यापैकी काही आदिवासी बांधवांना निवासी पट्टे मिळाले असले तरी ९० टक्क्यांहून अधिक नागरिक अजूनही पट्ट्याविना राहत आहेत.

सखल भागात राहणाऱ्या शिकलकर, अल्पसंख्यांक व एनटी/व्हीजे प्रवर्गातील नागरिकांना मूलभूत सुविधा अत्यंत अपुऱ्या प्रमाणात आहेत. पिण्याचे पाणी, पक्के रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांची येथे अजूनही कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

“महामार्ग ओलांडून शाळेत जीव धोक्यात घालून जाणाऱ्या मुलांना दिलासा द्या”

सायखोड (शिरमी) परिसराच्या अगदी पुढून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४७ आणि आशियाई महामार्ग ४६ तसेच राष्ट्रीय महामार्ग ५३/६ जात असल्यामुळे येथे राहणाऱ्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रोज जीव धोक्यात घालावा लागतो. शाळेसाठी दोन-दोन महामार्ग ओलांडताना अपघाताचा धोका कायम असतो.

त्यामुळे या भागातच प्राथमिक शाळा सुरू करण्याची मागणी प्रज्वल धोटे यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, “सध्या येथे एक शासकीय इमारत उपलब्ध आहे. तिची दुरुस्ती करून प्राथमिक शाळा सुरू केल्यास मुलांना सुरक्षित शिक्षणाची सुविधा मिळेल.”

नगरपंचायत व तालुका प्रशासनाकडे निवेदन

या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन आणि तालुका प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने प्रज्वल धोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवासी पट्टे, पक्के रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा यांसह घरकुल योजनांचा लाभ नागरिकांना त्वरित मिळावा, अशी मागणीही यामध्ये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *