पालिकेतील रिक्त शेड्युल्ड पदे भरणार – म्युनिसिपल कामगार सेना
Summary
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांच्या दालनात आज बैठक पार पडली. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या सभेत अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले. पालिकेतील सुमारे […]
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांच्या दालनात आज बैठक पार पडली. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या सभेत अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले. पालिकेतील सुमारे ५६ हजार रिक्त पदे टप्प्या-टप्याने भरण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी दिले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मलःनिसारण, मुख्य मलःनिसारण, गटारे, स्मशान भूमी आदी घाणीशी संबंधित काम करणाऱ्या कामगारांना लाड- पागे समितीच्या शिफारशींअन्वये वारसाहक्क नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.
नविन पेंशन योजना लागू असणार्या कर्मचाऱ्यांचे मागील २ वर्षांपासून रखडलेले देय दावे लवकर निकाली काढण्यासाठी (डी सी-१ दावे) सुधारीत व सोपी नियमावली प्रसारीत करण्याच्या सुचना डॉ. जोशी यांनी दिल्या.
एकाच ठीकाणी राहुन, कर्मचाऱ्यांची पिळवणुक करणाऱ्या सफाई खात्याच्या पी.टी. केस खात्यातील ३ लिपिक व केईएम रुग्णालयात सुमारे २६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्याचे आदेश झाल्याने, बदली परिपत्रकाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी मान्य करण्यात आल्याची माहीती डॉ. बापेरकर यांनी दिली.
सदर बैठकीस प्रशासनाच्यावतीने उपायुक्त किशोर गांधी, किरण दिघावकर, प्रमुख कामगार अधिकारी सुनिल जांगळे,प्रमुख कर्मचारी अधिकारी शारदा गोसावी व प्रमुख लेखापाल तर युनियनच्या वतीने खजिनदार महेंद्र पवार, मंदार गांवकर उपस्थित होते.

