विधानपरिषद कामकाज

राज्यात विक्रमी सोयाबीन खरेदी – पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १० : राज्यात यंदा 11.21 लाख मेट्रिक टन सोयाबीनची ऐतिहासिक खरेदी झाली असून ५.११ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ५५०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ही खरेदी पूर्णपणे डीबीटी प्रणालीद्वारे पारदर्शकपणे करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
विधानपरिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी अर्धातास चर्चे दरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. रावल बोलत होते.
भोकरदन तालुक्यातील एका सहकारी संस्थेद्वारे झालेल्या खरेदीबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने तत्काळ चौकशी सुरू केली असल्याचे सांगून मंत्री श्री. रावल म्हणाले की, काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आली. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, अशा कोणत्याही गैरप्रकारांना क्षमा केली जाणार नाही. पारदर्शकतेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, असे मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.
०००००