स्मार्ट मीटरविरोधात संतप्त आंदोलकांचा एल्गार; व्हेरायटी चौकात रस्तारोको, पोलिसांशी झटापट
Summary
नागपूर (प्रतिनिधी): राज्य सरकारच्या महावितरण विभागाकडून ग्रामीण आणि शहरी भागात लावण्यात येत असलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन करून रस्तारोको करण्यात आला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याची घटना […]

नागपूर (प्रतिनिधी): राज्य सरकारच्या महावितरण विभागाकडून ग्रामीण आणि शहरी भागात लावण्यात येत असलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन करून रस्तारोको करण्यात आला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली असून, काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलकांचा आरोप आहे की, स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांचे वीज बील वाढले आहे, अनेकवेळा रिचार्ज वेळेवर न झाल्यास वीजपुरवठा थांबतो, आणि मीटरच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी स्मार्ट मीटरची प्रतिकृती जाळत शासनाच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी घोषणाबाजी करत रस्ता अडवण्यात आला. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी येत आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही आंदोलक प्रतिकार करत असल्याने पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
या आंदोलनात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, गोंदिया आदी जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलन शांततेत पार पडावे म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
स्मार्ट मीटर हटवून पुन्हा जुने मीटर बसवावेत
वीज बीलात वाढ होत असल्याची चौकशी व्हावी
ग्राहकांची संमती न घेता बसवलेले मीटर रद्द करावेत
वीजप्रणालीत पारदर्शकता आणावी
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
—