स्मार्ट मीटरविरोधात संतप्त नागरिकांचे आंदोलन; पोलिसांशी झटापट

नागपूर (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील वीज ग्राहकांकडून स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वीज वितरण कंपनीकडून लावण्यात येणाऱ्या या स्मार्ट मीटरमुळे वीज बीलात वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, नागपूर शहरातील नेहरू चौकात रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
महावितरणकडून (MSEDCL) सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या स्मार्ट मीटरमुळे वीज बील वाढते, रिचार्ज वेळेवर न झाल्यास वीज पुरवठा तात्काळ खंडित होतो, आणि पारदर्शकतेचा अभाव आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी परवानगी न देता जबरदस्ती केली जात असल्याचेही आरोप आहेत.
या पार्श्वभूमीवर सोमवारी नागरिकांनी नेहरू चौकात रास्ता रोको आंदोलन करत बस थांबवली. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आंदोलन करणाऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही आंदोलकांनी विरोध केल्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटीची परिस्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
या आंदोलनात नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांतील कार्यकर्ते, महिला, युवक सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर तात्काळ हटवावेत आणि जुने मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी केली.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
स्मार्ट मीटर हटवून पुन्हा पारंपरिक मीटर बसवावेत
वीज बीलाच्या अनियमिततेची चौकशी करावी
जबरदस्तीने मीटर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
सर्व ग्राहकांना वीज वापराची पारदर्शक माहिती मिळावी
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
—