काटोल/ नरखेड येथिल क्रिडासंकुलाच्या विकासासाठी 8 कोटी द्या सलील देशमुखांची क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना मागणी

काटोल, प्रतिनीधी
काटोल व नरखेड येथील तालुका क्रिडा संकुलाच्या विकासासाठी मुंबई येथील मंत्रालयात या विभागाचे तत्कालिन मंत्री संजय बन्सोडे यांची भेट घेवून निधीची मागणी केली होती. या विकास कामासाठी 8 कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते. परंतु अद्यापही निधी देण्यात आला नाही. हा विकास निधी तातडीने देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी नुकतीच मुंबई अधिवेशनात क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेवून मागणी केली.
काटोल व नरखेड तालुक्यात क्रिडा विभागाच्या माध्यमातुन अनेक खेळाडु हे राज्य संघासह देशपातळीवर सुध्दा चमकले आहे. याच माध्यमातुन अनेक युवक – युवतींना पोलिस विभागासह इतर विभागात सुध्दा नोकरीची संधी सुध्दा उपलब्ध झाली आहे. काटोल येथील क्रिडा संकुलाच्या विकासासाठी 4 कोटी 58 लाख रुपयाच्या तसेच नरखेड येथील क्रिडा संकुलसाठी 7 कोटी 23 लाख रुपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तत्कालीन क्रिडा मंत्री सुनील केदार यांच्या काळात येथील कामाचा आराखडा तयार करण्यात आला होता अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली.
येथील विकास कामांना गती मिळावी यासाठी सलील देशमुख यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. तालुका क्रिडा अधिकारी, जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्यासोबत अनेक वेळा बैठका सुध्दा घेतल्या. पुणे येथील क्रिडा आयुक्त यांच्यासोबत सुध्दा भेट घेवून पुढे हा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला. तसेच मंत्रालययात क्रिडा विभागाचे सचिव यांच्यासह तत्कालिन मंत्री संजय बन्सोडे यांनी वरील कामासाठी 8 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. परंतु राज्यात सत्ताबदल होताच स्थानीक भाजपाच्या नेत्यांनी या कामासाठी मंजुर निधी वितरीत करण्यासाठी विरोध केल्यानेच हा निधी देण्यात येत नसल्याचा आरोप सुध्दा यावेळी सलील देशमुख यांनी दिला. हा निधी वितरीत न केल्याने काटोल व नरखेड तालुक्यातील खेळाडुमध्ये मोठया प्रमाणात नाराजी आहे.