महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस राज्यपालांकडून सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप

Summary

मुंबई, दि. २० : अरुणाचल प्रदेश व मिझोरम या उत्तरपूर्वेकडील राज्यांची संस्कृती व लोककला आपल्या गीत व नृत्याद्वारे उत्कृष्टपणे सादर केल्याबद्दल राज्यपाल तसेच कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी संजीवनी भेलांडे […]

मुंबई, दि. २० : अरुणाचल प्रदेश व मिझोरम या उत्तरपूर्वेकडील राज्यांची संस्कृती व लोककला आपल्या गीत व नृत्याद्वारे उत्कृष्टपणे सादर केल्याबद्दल राज्यपाल तसेच कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी संजीवनी भेलांडे यांनी आपल्या सुरेल स्वरांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यगीत सादर केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपालांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन राजभवनातर्फे डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सहकार्याने करण्यात आले होते.

विभिन्न धर्म, जात, संप्रदाय व भाषा बोलणारे लोक देशात गुण्यागोविंदाने राहत असून गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही राज्यांनी अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. खंडप्राय असलेला भारत एकसंध असल्यामुळे त्याचे जागतिक पटलावर महत्वाचे स्थान निर्माण झाले असून आज भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे, असे राज्यपालांनी सांगितले. विभिन्न राज्यांमधील एकात्मतेमुळे स्वातंत्र्याच्या शतकी वर्षापर्यंत भारत विकसित राष्ट्र निर्माण होईल,  असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात उत्तरपूर्व राज्यांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांमध्ये तेथील सर्व राज्यांना रेल्वे, रस्ते तसेच हवाई मार्गाने जोडले आहे. भारत सरकारच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणामुळे उत्तर पूर्वेकडील राज्ये दक्षिण आशियाई देशांशी जोडले गेले असून आगामी काळात आपण इंडोनेशियापर्यंत रस्ते मार्गाने जोडले जाऊ. उत्तरपूर्व राज्ये ही स्वित्झर्लंडप्रमाणे निसर्ग सौंदर्याने नटली असून विदेशात जाण्याअगोदर लोकांनी आपल्या देशातील उत्तरपूर्व राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. अरुणाचल प्रदेश येथे लोक परस्परांना भेटतात त्यावेळी ते ‘जय हिंद’ म्हणतात ही गोष्ट सर्वांनी शिकण्यासारखी आहे.

विविध राज्यांचे राज्यस्थापना दिवस साजरे केल्यामुळे राज्यातील लोकांना त्या त्या राज्यांच्या लोककला व जनजीवन याबद्दल अधिक माहिती मिळत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठाच्या सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोक गीत व नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला तसेच दोन्ही राज्यांची माहिती देणारे माहितीपट सादर केले.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत यांसह सिडनहॅम व इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *