BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘आरे’चा मास्टर प्लॅन तयार – दुग्धविकास मंत्री अतुल सावे

Summary

मुंबई, दि. १७: गोरेगाव परिसरातील आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांत ‘आरे’चा कायापालट झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. दुग्धविकास मंत्री सावे यांनी आरे दुग्ध […]

मुंबई, दि. १७: गोरेगाव परिसरातील आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांत ‘आरे’चा कायापालट झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

दुग्धविकास मंत्री सावे यांनी आरे दुग्ध वसाहत परिसराची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार मुरजी पटेल, आमदार बाळा नर, ‘आरे’चे सीईओ श्रीकांत शिपूरकर उपस्थित होते.

दुग्धविकास मंत्री सावे म्हणाले, ‘आरे’ दुग्धवसाहतीकडे सध्या ११६२ एकर जमीन शिल्लक असून यात दुग्धवसाहत, गोशाळा, तबेले, बगीचा, लॉन, पॅराग्रास व वृक्षारोपण करण्यात आले आहे.

आरे परिसरातील परिसर विकास करत असताना पर्यावरण संवर्धनास प्राधान्य दिले जाईल. या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध बदल करण्याच्या सूचना श्री. सावे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणी तसेच परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना मंत्री श्री.सावे यांनी यावेळी केल्या. यावेळी आरेच्या सर्वांगिण विकासासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीने मास्टर प्लॅन संदर्भात सादरीकरण केले. मास्टर प्लॅननुसार आरे दुग्धवसाहतीचा आठ टप्प्यात विकास करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये दुर्मिळ प्राणी, वन्यजीव व वनस्पतींचा शोध घेणे, अत्याधुनिक गोशाळा उभारणे, बोटींग, बगिचा, कलादालन आदी उभारण्यात येणार आहे.

बैठकीनंतर मंत्री सावे यांनी आरे नर्सरी गट क्र. २०, गणेश तलाव, रवींद्र आर्ट गॅलरी, आरे रुग्णालय, न्यूझीलंड हॉस्टेल, छोटा काश्मीर उद्यान, गट क्रमांक २ येथील परिसर या भागांना भेट देऊन पाहणी केली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *