लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती द्या – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
Summary
मुंबई दि. १०: बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. यादृष्टीने परिसरातील विकास कामांना गती देण्याचे निर्देश पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयातील […]

मुंबई दि. १०: बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. यादृष्टीने परिसरातील विकास कामांना गती देण्याचे निर्देश पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयातील दालनात लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन, आणि विकास आराखडा संदर्भात बैठक झाली. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, तसेच व्हीसीद्वारे बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, पुरातत्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक उपस्थित होते.
पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघण्यासाठी सामान्य पर्यटकांसह संशोधन करणारे पर्यटकही जगभरातून मोठ्या प्रमाणावर येतात. संशोधनासाठी नासाचे शास्त्रज्ञही अनेकवेळा येथे येत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी योग्य सुविधा देण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यात यावी. पर्यटन विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. पर्यटक लोणार सरोवराकडे आकर्षित व्हावे यासाठी त्या ठिकाणी तारांगण, संग्रहालय, चिल्ड्रन पार्क, गार्डन एमटीडीसीचे रेस्ट हाऊसचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश देसाई यांनी यावेळी दिले. या ठिकाणी पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून रोपवेची सुविधा करता येईल का, यासंदर्भात पाहणी करावी.
०००