संपादकीय हेडलाइन

ममता आपण कोणाच्या दीदी आहात? बुधवार, २१ ऑगस्ट २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

Summary

कोलकता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज व इस्पितळात एका प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर झालेला गँगरेप आणि नंतर तिची झालेली निर्घृण हत्या या घटनेने पश्चिम बंगालमध्ये जनतेतून प्रक्षोभ प्रकटला. समाजाच्या सर्व स्तरातून निषेध रस्त्यावर प्रकट झाला. महिला, डॉक्टर्स, विद्यार्थी, वकील […]

कोलकता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज व इस्पितळात एका प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर झालेला गँगरेप आणि नंतर तिची झालेली निर्घृण हत्या या घटनेने पश्चिम बंगालमध्ये जनतेतून प्रक्षोभ प्रकटला. समाजाच्या सर्व स्तरातून निषेध रस्त्यावर प्रकट झाला. महिला, डॉक्टर्स, विद्यार्थी, वकील यांचे मोर्चे निघाले. राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत तरीही सरकारी मेडिकल कॉलेज व इस्पितळात महिला डॉक्टरवर गँगरेप होतो व तिची क्रूरपणे हत्या केली जाते, अशी भयावह व लांच्छनास्पद घटना कशी घडू शकते? ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. गृहखाते व पोलीस यंत्रणा त्यांच्या अधिकारातच येते. एवढेच नव्हे तर राज्याच्या आरोग्यमंत्री त्याच आहेत. मग मेडिकल कॉलेजमधील गँगरेप व हत्येला जबाबदार कोण? ममता यांना सारा देश दीदी म्हणून ओळखतो, पण त्यांच्याच राज्यात सरकारी मेडिकल कॉलेज-इस्पितळात रात्री ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार होतो, याची जबाबदारी ममता यांना कशी झटकता येईल? गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील जनतेने ममता व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला भरभरून मतदान केले व ममता यांनी मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रीक संपादन केली. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी ममता यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून तृणमूल काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून दिले. पण याचा अर्थ असा नव्हे की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला तरी जनतेने शांत बसावे व ममता यांना दीदी म्हणून पुकारावे.
गेल्या १५ वर्षांत राज्यात गुंडगिरी नि गुन्हेगारी वाढली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सर्वत्र दहशत आहे. तृणमूलची दंडेलशाही मोडून काढण्याचा भाजपाने अनेकदा प्रयत्न केला, पण त्यात फारसे यश आले नाही. आरजी कर इस्पितळात बलात्कार व हत्येची शिकार झालेली डॉक्टर मुलगी सुवर्णपदक मिळविण्याच्या ईर्ष्या रात्रंदिवस अभ्यास करीत होती. आई-वडिलांनी तिला गरिबीतून वाढवले. आई-वडिलांना सुखी जीवन देण्याचे तिचे स्वप्न गँगरेप व हत्येनंतर एका रात्रीत काही तासात उद्ध्वस्त झाले. तिच्या घरी यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या दुर्गा पूजेची तयारी सुरू झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून या मुलीनेच पुढकार घेऊन घरी दुर्गा पूजा सुरू केली होती. यंदा पीजीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला म्हणून पूजा मोठी करायचे तिने ठरवले होते. पण नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून तिला आयुष्यातूनच कायमचे संपवले. दिल्लीत २०१२ मध्ये बसमध्ये गँगरेप व क्रूर हत्या झालेल्या तरुणीला लोकांनी निर्भया म्हणून संबोधित होते. कोलकत्यामध्ये १० ऑगस्टच्या पहाटे सरकारी इस्पितळात गँगरेप व हत्या झालेल्या तरुणीला अभया असे लोकांनीच नाव दिले आहे. अभया मृदुभाषी होती. जेईई व मेडिकल एन्टरन्समध्ये तिने यश मिळवले. एमबीबीएससाठी तिने आरजी कर मेडिकल कॉलेज निवडले. कोलकत्याजवळ सोदेपूर येथे तिचे घर. घरापासून बसने एका तासाच्या अंतरावर आरजी कर मेडिकल कॉलेज आहे. दहावीला बोर्डाच्या परीक्षेत तिला ९० टक्के गुण मिळाले होते. उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्के गुण मिळाले होते. आई-वडिलांची ती एकुलती एक कन्या होती. आरजी कर मेडिकल कॉलेज व इस्पितळ हे आपले दुसरे घर आहे, असे समजून ती तेथे शिकत होती.अभया आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये चेस्ट मेडिसीन डिपार्टमेंटची विद्यार्थिनी होती. तिच्यावर गँगरेप झाला. त्या रात्री ती ड्युटीवर होती. इमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर सेमीनार हॉलमध्ये ती रात्री होती. सेमीनार हॉलमध्ये लेक्चर्स व सेमीनार नेहमी होत असत. रात्री डॉक्टर्स तिथेच विश्रांती घेतात. डॉक्टरांना विश्रांतीसाठी वेगळी सोय इथे नाही. आरजी कर मेडिकल इस्पितळात पेशंट्स व त्यांच्या नातेवाइकांची नेहमी गर्दी असते. कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर्स यांची ये-जा मोठी असते. तरीही अभयावर गँगरेप झाला व तिची क्रूर हत्या झाली हे कुणालाच कसे समजले नाही? इस्पितळाच्या असिस्टंट सुपरिटेंडटने अभयाच्या घरी फोन करून सकाळी तिची तब्येत बिघडली असा निरोप दिला, नंतर काही वेळाने दुसरा फोन करून तिने आत्महत्या केली असे सांगितले. आई-वडील घाईघाईने इस्पितळात आले तेव्हा त्यांना काही तास प्रतीक्षा केल्यावर मुलीच्या मृतदेहाचे दर्शन देण्यात आले, तेव्हा तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. रक्त पडलेले होते. अंगावर कपडे नव्हते. तिच्या डोळ्यांत चष्म्याच्या काचा घुसल्या होत्या. अभयाने आत्महत्या केली असे सांगून तिची हत्या दडपण्याचा प्रयत्न का झाला? कोणाच्या सांगण्यावरून तसा निरोप तिच्या आई-वडिलांना दिला? घटनेच्या दुसऱ्या दिवशी संतप्त जमाव इस्पितळात घुसला व त्यांनी मोठी तोडफोड केली. पोलिसांच्या साक्षीने जमावाने हुल्लडबाजी केली. दंगलखोरांनी नर्सिंग डिपार्टमेंट, मेडिकल स्टोअर, चेस्ट डिपार्टमेंट, इमर्जन्सी बिल्डिंग येथे साधनसामग्रीचे मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे तिथे कुठेही सीसीटीव्ही नाही. एकीकडे अभयाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी महिलांचे मोर्चे रस्त्यावर आले व दुसरीकडे जमावाने इस्पितळात घुसून हुल्लडबाजी केली. पोलिसांना कशावरही नियंत्रण ठेवता आले नाही, मोठा जमाव घुसणार हे कळलेच नाही. अभयावर गँगरेप व हत्या या विरोधात कोलकत्या रस्त्यांवर प्रक्षोभ व आक्रोश प्रकट झाला. ज्यांनी ममता बॅनजी यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केले, तीच जनता रस्त्यावर येऊन त्यांच्या विरोधात घोषणा देऊ लागली. सर्वात कहर म्हणजे लोकांचा संताप बघून स्वत: ममता रायटर्स बिल्डिंगमधून बाहेर पडल्या व पक्षाच्या समर्थकांसह रस्त्यावर आल्या. अभयाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. ममता या मुख्यमंत्री आहेत, त्या कोणाच्या विरोधात रस्त्यावर आल्या? अभयाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी कोणाकडे केली? कोलकता पोलिसांचा संथगतीने चाललेला तपास बघून लोक आणखी भडकले. पोलीस मुख्यालयावर मोर्चे गेले. केवळ एकाला अटक करून पोलीस गप्प कसे बसतात? गँगरेप करणारे इतर नराधम कुठे आहेत? पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करीत आहेत? पोलीस कोणाला वाचवत आहेत? असे प्रश्न विचारणारे फलक झळकू लागले. भाजपा व डाव्या पक्षांनी तर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी थेट मागणी केली. त्यातच कोलकता उच्च न्यायालयाने अभया गँगरेप व हत्या यांचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिल्याने तृणमूल काँग्रेस सरकारची देशात बेअब्रू झाली. अभयावर झालेला गँगरेप हा मोठा कट कारस्थानाचा भाग होता का? तिची नराधमांनी निर्घृण हत्या केल्यावरही इस्पितळाने तिने आत्महत्या केली असे प्रथम का सांगण्यात आले? अभयाच्या परिवाराला अंधारात का ठेवण्यात आले? तिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम घाईघाईने का करण्यात आले? ज्या सेमीनार हॉलमध्ये तिच्यावर गँगरेप झाला तिथे नूतनीकरणाच्या नावाखाली लगेच काम का सुरू केले व कोणाच्या सांगण्यावरून? गँगरेप व हत्या यांचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? ममता बॅनर्जी या राज्याच्या सर्वेसर्वा असताना अभयाला न्याय मिळावा म्हणून त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ का आली? अभयाच्या गँगरेप व हत्येच्या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये कोणीही सुरक्षित नाही, याची चर्चा देशभर सुरू झाली आहे. गँगरेप व हत्या हे दोन्ही भयावह गुन्हे सुरुवातीला लपवण्याचा प्रयत्न झाला हे तर लांच्छनास्पद आहे. कोलकता पोलिसांना इतर नराधमांना शोधून अटक करण्यात अपयश आले. इस्पितळात घुसून तोडफोड करणाऱ्या जमावालाही पोलीस रोखू शकले नाहीत. या घटनेनंतर कोलकताच नव्हे तर दिल्ली, मुंबई, चंदिगड, बंगळूरु, हैदराबाद, चेन्नई, पाटणा या देशात सर्वत्र डॉक्टरांचे निषेध मोर्चे निघाले. ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व आंदोलनातूनच निर्माण झाले आहे. आंदोलकांच्या भावना व मागण्या काय आहेत, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. मग त्यांची राज्यातील कायदा- सुव्यवस्थेवरून पकड ढिली झाली आहे का? म्हणूनच या संपूर्ण प्रकारानंतर एकच प्रश्च विचारावासा वाटतो, ममता आपण कोणाच्या दीदी आहात?
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *