‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ शासनाची महत्त्वाकांक्षी योजना – मंत्री दीपक केसरकर
Summary
योजनेच्या लाभाचे भायखळा येथे महिलांना प्रत्यक्ष वितरण नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमांद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे – मंत्री मंगल प्रभात लोढा रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण मुंबई, दि. १७: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. […]
योजनेच्या लाभाचे भायखळा येथे महिलांना प्रत्यक्ष वितरण
नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमांद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे – मंत्री मंगल प्रभात लोढा
रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण
मुंबई, दि. १७: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही योजना जाहीर केली. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास मुंबई शहर, उपनगर आणि मुंबई महानगरपालिका यांच्या समन्वयाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाचे भायखळा येथे महिलांना प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे केसरकर बोलत होते.
या समारंभास मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच आमदार यामिनी जाधव, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, तसेच मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेश क्षीरसागर, मुंबई उपनगर महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी शोभा शेलार, भायखळा समितीचे अध्यक्ष अतुल शहा, शिवडी समिती अध्यक्ष आशा मामेडी, उपजिल्हाधिकारी श्री. सुरवसे, तहसीलदार दीपाली गवळी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, एकात्मिक बाल विकास योजनेचे उपायुक्त विजय सागर, मुंबई उपनगरचे नोडल अधिकारी अबुल चौधरी, मुंबई शहरचे नोडल अधिकारी शशिकांत चौहान, तसेच जिल्हा बाल विकास विभागातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, या सरकारने सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या माता-भगिनीसाठी दिवसरात्र काम करुन ही योजना त्यांच्यापर्यंत पोहचवली, त्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह सर्वांचा सकारात्मक सहभाग राहिल्यामुळे ही योजना कमी वेळेत राबविता आली. महिला जर सक्षम असेल तर संपूर्ण कुटूंब सक्षम होते. यामध्ये महिलांना मिळणाऱ्या रकमेला महत्व नसून तिच्याप्रती कुटुंबप्रमुख म्हणून व्यक्त केलेली भावना महत्त्वाची आहे. यामुळे महिलांचा आत्मसन्मान वाढीस लागणार आहे, तसेच कुटुंबाचे उत्पन्नही वाढीस लागण्यास हातभार मिळणार आहे. या योजनेचा समाजातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा.

नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमांद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे – मंत्री मंगल प्रभात लोढा
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमाद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे. सर्वासाठी स्वयंरोजगार आणि रोजगार मिळावा यासाठी हे सरकार काम करत आहे. व्यवसाय सुरु करण्यासाठी कौशल्या विभागाने एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. त्याद्वारे नोंदणी करून आपल्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती देता येणार आहे. यामध्ये आपला माल कसा तयार करायचा, कुठे विकायचा याचे प्रशिक्षण या ॲपद्वारे देण्यात येणार आहे.
यावेळी मुंबई शहर आणि उपनगरमधील लाभार्थी महिलांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुंबई उपनगर महिला व बालविकास अधिकारी, शरद कुऱ्हाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वाती गवाणकर यांनी केले. मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी, शोभा शेलार यांनी आभार मानले
०००
