नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री दादाजी भुसे

Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न नाशिक, दिनांक 15 ऑगस्ट, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सेवा- सुविधा मिळतील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात नाशिकला एज्युकेशन […]

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न

नाशिक, दिनांक 15 ऑगस्ट, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सेवा- सुविधा मिळतील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात नाशिकला एज्युकेशन हब बनविण्याच्या दृष्टीने सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. दिंडोरी तालुक्यातील मौजे शिवनई येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, हेमलता बीडकर, अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. संपत काळे, बाकेराव बस्ते, राजेंद्र भांबर, प्रशांत सूर्यवंशी, प्रा. चिंतामणी निगळे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, विद्यापीठाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून बहुप्रतिक्षेत असणारे नाशिक उपकेंद्र हे पूर्णत्वास जात आहे ही आनंदाची बाब आहे. 31 हजार स्क्वेअर फुटाचे 3 मजली भव्य मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मागील 2 वर्षातील काळात उभे राहिले आहे. या ठिकाणी आज 63 एकर जागेला संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. या वर्षात येथे एमबीए व बीबीए रिसर्च सेंटर सह टेंपल मॅनेजमेंट हे कोर्स सुरू होणार असून उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ही मोठी भर पडणार आहे. सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, संस्था प्राध्यापकांची कामे या ठिकाणी झाल्यास हे केंद्र जिल्ह्यातील 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. तसेच या कामी पुणे येथे जाण्याचे श्रम वाचून नाशिककरांच्या वेळ व पैशाची बचत होईल व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचाही ताण कमी होईल, असे मत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी याप्रसंगी मांडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिकाधिक जोडण्याच्या दृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच आमदार, खासदार निधीसह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी निर्णय घेवून यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शैक्षणिक विभागाच्या इमारती, रस्ते व मुलभूत विकासाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. तसेच येत्या महिनाभरात या उपकेंद्राचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *