मुंबई महापालिकेच्या रूग्णालयांतील रिक्त शेड्युल्ड पदे आता भरली जाणार ! डॉ.संजय बापेरकर
Summary
मुंबई महापालिकेची प्रमुख रूग्णालये व उपनगरीय रूग्णालयांतील “प्रयोग शाळा तंत्रज्ञ” संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे उपायुक्त श्री.संजय कुर्हाडे यांच्या दालनात एक संयुक्त बैठक पार पडली. ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’च्या वतीने आयोजित केलेल्या सदर बैठकीत रूग्णालयातील प्रयोगशाळा […]
मुंबई महापालिकेची प्रमुख रूग्णालये व उपनगरीय रूग्णालयांतील “प्रयोग शाळा तंत्रज्ञ” संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे उपायुक्त श्री.संजय कुर्हाडे यांच्या दालनात एक संयुक्त बैठक पार पडली. ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’च्या वतीने आयोजित केलेल्या सदर बैठकीत रूग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या रिक्त पदांबरोबरच ‘क्ष’किरण तंत्रज्ञ/सहाय्यक, कक्ष परिचर,आया,हमाल, सेवक, कामगार व तत्सम रिक्त शेड्युल्ड पदे भरण्याची मागणी केली असता, सर्वच रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे रूग्णालयातील रिक्त शेड्युल्ड पदे आता तरी भरली जातील अशी आशा ‘कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने “बिंदू नामावली” पडताळली असुन, कोकण भवन येथुन, पुढील कार्यवाही होताच, विधानसभा आचारसहिंतेच्या अगोदर वरील सर्व पद भरतीची जाहिरात निघेल असे आश्वासन उपायुक्त संजय कुर्हाडे यांनी दिल्याचे बापेरकर म्हणाले.
रूग्णालयीन कर्मचाऱ्यांची १०-२०-३० अशी आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत रखडलेली पदोन्नती आता मार्गी लागणार आहे. बीएससी(माइक्रोबायोलॉजी) अहर्ता धारण करुन, सेवेत दाखल झालेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांना पुढील पदोन्नतीसाठी DMLT ही अट शिथिल केली जाणार आहे. ‘स्वच्छता निरिक्षक पदविका’ धारण करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतन सुधारणा समितीच्या धोरणाप्रमाणे २४०० वेतनश्रेणी देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच पालिकेच्या कुपर रूग्णालयांतील प्रयोगशाळा तंत्रज्ञांची रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत पालिकेच्यावतीने १० कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासित करण्यात आले आहे.
